जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:26 IST2025-12-18T15:25:25+5:302025-12-18T15:26:35+5:30
Karwar News: कर्नाटकमधील कारवार येथे चिनी जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस लावलेला एक सीगल पक्षी साडल्याने खळबळ उडाली आहे. हा पक्षी कारवारमधील थिम्मका गार्डनच्या मागे आढळून आला होता. भारताची विमानवाहून युद्धनौका आयएनएस विक्रांतचा तळ आणि जवळच कैगा अणुऊर्जा प्रकल्प असल्याने अशा संवेदनशील ठिकाणांजवळ हा पक्षी सापडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
कर्नाटकमधील कारवार येथे चिनी जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस लावलेला एक सीगल पक्षी साडल्याने खळबळ उडाली आहे. हा पक्षी कारवारमधील थिम्मका गार्डनच्या मागे आढळून आला होता. भारताची विमानवाहून युद्धनौका आयएनएस विक्रांतचा तळ आणि जवळच कैगा अणुऊर्जा प्रकल्प असल्याने अशा संवेदनशील ठिकाणांजवळ हा पक्षी सापडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभाग, स्थानिक पोलीस आणि नौदलाने संयुक्त तपास सुरू केला आहे.
या सीगल पक्षाच्या पाठीवर एक छोटं इलेक्ट्रॉनिक उपकरण लावलेलं असल्याची बाब स्थानिक लोकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या उपकरणाबाबत शंका आल्याने त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. तक्रार मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पक्षाला सुरक्षितरीत्या पकडले. तसेच त्याबाबत पुढील चौकशी सुरू केली. कारवारमध्ये नौदलाचा एक तळ असल्याने तसेच आयएनएस विक्रांत या जहाजालाही इथेच उभं करून ठेवण्यात येत असल्याने, त्याबरोबरच कैगा अणुऊर्जा प्रकल्पही जवळच असल्याने हा परिसर संवेदनशील मानला जातो.
पक्ष्याच्या पाठीवरील जीपीएस डिव्हाईस जेव्हा बारकाईने पडताळून पाहण्यात आला तेव्हा ते उपकरण चीनमधील एका संशोधन संस्थेचे असल्याचा उल्लेख लिहिलेला आढळला. मात्र हे उपकरण केवळ शास्त्रीय संशोधनापुरते नसून संरक्षणाशी संबंधित आहे का याची माहिती घेण्यासाठी त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासामध्ये चिनी संशोधकांनी पक्ष्यांचा प्रवास मार्ग, भोजनाच्या सवयी आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावला असावा, अशी माहिती समोर येत आहे. जगभरात अशा पक्षांवर जीपीएस ट्रॅकर लावले जाणं ही संशोधनामधील सामान्य बाब आहे. त्यामधून हे पक्षी कुठे जातात, कुठल्या रस्त्याने जातात आणि त्यांचं वर्तन सं असतं हे जाणून घेण्यास मदत मिळते.
दरम्यान, संवेदनशील भागात पक्ष्याच्या पाठींवर हा जीपीएस डिव्हाईस मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. आम्ही कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाही. त्यामुळे हे यंत्र केवळ संशोधनाच्या हेतूने तयार करण्यात आले होते की त्यामागे अन्य काही हेतू होता, याचाही तपास केला जात आहे, असे तपास यंत्रणांनी सांगितले. तर ताब्यात घेण्यात आलेल्या पक्षाला मरीन फॉरेस्ट डिव्हिजन कार्यालयात ठेवण्यात आले आहे. तसेच व विभागाकडून हे ट्रॅकिंग प्रोजेक्ट अधिकृत मान्यताप्राप्त आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी वन विभागाने चिनी अॅकॅडमी ऑफ सायन्सेसशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.