हिंदी येणारे तरुण तातडीनं हवेत! चिनी सैन्यात मेगाभरती; ड्रॅगनचा नेमका प्लान काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 21:10 IST2022-05-04T21:08:13+5:302022-05-04T21:10:49+5:30
चिनी लष्कराचा मेगाप्लान; हिंदी भाषेची जाण असणाऱ्या तरुणांची मोठ्या प्रमाणात भरती करणार

हिंदी येणारे तरुण तातडीनं हवेत! चिनी सैन्यात मेगाभरती; ड्रॅगनचा नेमका प्लान काय?
नवी दिल्ली: चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं (पीएलए) हिंदीची जाण असलेल्या तरुणांची भरती सुरू केली आहे. एका गोपनीय अहवालातून ही माहिती समोर आली आहे. तिबेटमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी चिनी सैन्य हिंदी भाषा येणाऱ्या तरुणांची भरती करत आहे. चीनच्या विविध विद्यापीठांमधून पदवी घेतलेल्या हिंदी दुभाष्यांना लष्करात सेवा देण्याची संधी दिली जाणार आहे.
तिबेटमध्ये येत्या जूनपर्यंत हिंदी येणाऱ्यांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी चिनी लष्करानं योजना तयार केली आहे. हिंदी जाणणाऱ्या तरुणांची भरती वेस्टर्न थिएटर कमांडकडून केली जाणार आहे. भारताला लागून असलेल्या सीमेचं संरक्षण करण्याची जबाबदारी याच कमांडकडे आहे. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड भागाला लागून असलेल्या सीमेवर वेस्टर्न थिएटर कमांडचे सैनिक पहारा देतात.
तिबेट सैन्य जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत हिंदी दुभाष्यांसाठी अनेक महाविद्यालयं आणि विद्यापीठांचा दौरा केला आहे. तिथे जाऊन ते आपल्या लष्करी कार्यक्रमांची माहिती देत आहेत आणि तरुणांच्या भरतीची प्रक्रिया राबवत आहेत. भारताच्या उत्तर सीमेवरील आपल्या शिबिरांमध्ये हिंदी बोलू शकतील, अशा तरुणांची भरती चिनी सैन्याकडून सुरू असल्याची गोपनीय माहिती याआधीही समोर आली होती. लष्करातील सैनिक आणि अधिकाऱ्यांना हिंदी शिकवण्यासाठीही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.