चीनच्या व्हिवोची हेराफेरी, ईडीने टाकले छापे; ड्रॅगनला पैसा पाठवत असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 05:58 IST2022-07-06T05:58:28+5:302022-07-06T05:58:57+5:30
व्हिवो या ब्रँडची निर्मिती करणाऱ्या बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या जम्मू-काश्मीर येथील वितरकाने कंपनीतील चिनी समभागधारकांची बनावट ओळख सादर केली होती

चीनच्या व्हिवोची हेराफेरी, ईडीने टाकले छापे; ड्रॅगनला पैसा पाठवत असल्याचा संशय
मुंबई/नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्मितीतील अग्रगण्य कंपनी असलेल्या व्हिवो या चिनी कंपनीवर, तसेच कंपनीशी संबंधित अन्य चिनी कंपन्या, अशा एकूण ४४ ठिकाणांवर मंगळवारी ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी छापे टाकले. या कारवाईत ईडीने मुंबई- दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि मेघालय या राज्यांत छापे टाकत कागदपत्रे ताब्यात घेतली.
व्हिवो या ब्रँडची निर्मिती करणाऱ्या बीबीके इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या जम्मू-काश्मीर येथील वितरकाने कंपनीतील चिनी समभागधारकांची बनावट ओळख सादर केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्यात मोठ्या प्रमाणात पैशांची फिरवाफिरवी झाल्याची माहिती पुढे आल्याचे समजते. त्यामुळे हा तपास ईडीने सुरू करत याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. समभागधारकांची बनावट ओळख सादर करत कंपनीने चीनमधे मोठ्या प्रमाणावर पैसा पाठविल्याचा ईडीला संशय आहे. याच अनुषंगाने ईडीने मंगळवारी देशव्यापी कारवाई केली.
का आहेत चिनी कंपन्या रडारवर?
भारतातून चीनमधे पैसा पाठविला जात असल्याचा संशय आहे. कंपनीतील समभागधारकांची बनावट ओळख सादर केल्याचा आरोप आहे. ३० एप्रिल रोजी शाओमी कंपनीवर ईडीने धाड टाकली हाेती. या कारवाईत ईडीने ५,५७२ कोटी जप्त केले होते.