सीमेवर घुसखोरीचा चीनचा डाव उधळला, पॅनगाँग त्सो सरोवराकाठी लष्कराची तत्परता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 05:54 AM2020-09-01T05:54:23+5:302020-09-01T05:55:43+5:30

लष्कराने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनानुसार चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (पीएलए) ही नवी आगळीक २९ व ३० आॅगस्टदरम्यानच्या रात्री पॅनगॉँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठापाशी केली.

China's incursion into the border foiled, military readiness near Pangong Tso Lake | सीमेवर घुसखोरीचा चीनचा डाव उधळला, पॅनगाँग त्सो सरोवराकाठी लष्कराची तत्परता

सीमेवर घुसखोरीचा चीनचा डाव उधळला, पॅनगाँग त्सो सरोवराकाठी लष्कराची तत्परता

Next

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील सैन्य माघारीवरून गेले चार महिने सुरू असलेला तिढा सुटलेला नसताना चीनने या सीमेवर नव्या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीय लष्कराने तत्परतेने आधीच प्रतीकारात्मक पावले उचलून चिनी सैन्याचा हा कुटिल डाव उधळून लावला.
लष्कराने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनानुसार चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (पीएलए) ही नवी आगळीक २९ व ३० आॅगस्टदरम्यानच्या रात्री पॅनगॉँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठापाशी केली. विशेष म्हणजे यापूर्वी चीनचे सैन्य सीमा ओलांडून पुढे आल्यावरून झालेली तणतणी या सरोवराच्या उत्तर काठावर झाली होती. यावरून वादाचे आधीचे मुद्दे सोडविण्याऐवजी चीन नवा वाद निर्माण करू पाहत असल्याचे जाणकारांना वाटते.


लष्कराने म्हटले की, आधीची कोंडी सोडविण्याच्या संदर्भात लष्करी कमांडर व राजनैतिक पातळीवरील चर्चेत झालेल्या उभयपक्षी सहमतीला बगल देऊन ज्याने ‘जैसे थे’ स्थिती बदलेल, अशा लष्करी हालचाली करण्याचा प्रयत्न ‘पीएलए’ने केला. भारतीय सैन्याने आधीपासूनच तयारीत राहून आपली गस्तीची ठिकाणे बळकट करण्याची लगेच पावले उचलून जागेवरील स्थितीत कोणताही बदल होऊ दिला नाही. सीमेवर शांतता व सलोखा राहावा यासाठी चर्चेतून मार्ग काढण्यास भारतीय लष्कर जसे कटिबद्ध आहे . सीमेवर चुशूल येथे दोन्ही सैन्यांची ब्रिगेड कमांडरच्या पातळीवरील ‘ध्वजबैठक’ सुरू असल्याचेही लष्कराच्या निवदेनात नमूद केले गेले.

आम्ही सीमा पाळतो चीनचा नवा कांगावा
बीजिंग : आमचे सैन्य भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा नेहमीच कसोशीने आदर करते, असा कांगावाखोर दावा चीनने सोमवारी केला. पूर्व लडाख सीमेवर पॅनगॉँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठावर ‘पीएलए’ने नवी आगळीक करण्याचा प्रयत्न केल्याचे भारतीय लष्कराने दिल्लीत म्हटले होते.

त्याविषयी विचारता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन म्हणाले, सीमेवरील आमचे सैन्य प्रत्यक्ष िायंत्रण रेषेचे काटेकोर पालन करते. ते ती सीमा कधीही ओलांडत नाही. प्रत्यक्ष जागेवरील स्थितीविषयी सीमेच्या दोन्ही बाजूंकडील सैन्य एकमेकांच्या सतत संपर्कात आहे.

जे २० विमानांना राफेलचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : चीनचा इरादा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचाच आहे. चीनने चेंगडू जे २० विमाने लडाखनजीक सीमेवर तैनात केली आहेत, तर भारतानेदेखील राफेल विमाने सज्ज ठेवली आहेत. चिनी सैनिकांची छोटीशी कृतीदेखील त्यांना महागात पडेल. त्यांना धडा शिकवण्यास तयार राहा, असे निर्देश लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिल्याचा दावा सूत्रांनी केला. पँगाँग सो सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैनिकांची हालचाल वाढल्याने भारतानेही युद्धसज्जता केली आहे.
चीनने होटन एअर बेसवर जे २० विमाने ठेवली आहेत. याआधी या एअर बेसवर विमाने नव्हती. अर्थात चीनच्या जे २० पेक्षा राफेल विमाने सरस आहेत. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर टेक्नॉलॉजीत राफेल सर्वोत्तम आहेत, त्यातील मेटॉर प्रणाली, बीव्हीआरएएएम तंत्रज्ञान हवेतून जमिनीवर मारा करण्याची विश्वंसक क्षमता सर्वाधिक आहे. पर्वतराजीतही राफेलची क्षमता कायम राहते.

नेमके काय झाले?

पँगाँग सो सरोवरात स्वहद्दीत चिनी सैनिकांनी तळ ठोकला आहे. पूर्वस्थितीनुसार आपल्या क्षेत्रात नियंत्रणरेषेच्या कक्षेत थांबण्याची भारताची मागणी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भारताने हीच मागणी कायम ठेवली.

चीननेही वेळोवेळी त्यास सहमती दर्शवली. राजनैतिक, लष्कर, परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत मागे हटण्याची तयारी दाखवली. संपूर्णपणे स्वहद्दीत माघार घेतल्याशिवाय चर्चा निष्फळ ठरेल, असे भारताने वारंवार बजावले.

२९ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून ते ३० आॅगस्टच्या पहाटेपर्यंत सरोवराच्या दक्षिण किनाºयावर चिनी सैनिकांनी बांधकाम आरंभले. साधारण ५०० सैनिक होते, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. जवानांनी त्यास विरोध केला. शक्तिप्रदर्शन केले. शारीरिक इजा दोन्ही बाजूंनी कुणासही झाली नाही. जवानांनी मानवी भिंत तयार केली व युद्धस्थितीतील कवायती केल्याचा दावा सूत्रांनी केला. ड्रॅगनच्या कावेबाजपणाचा अंदाज असल्याने जवान सज्ज होते. त्यामुळे चिनी सैनिकांना मागे हटावे लागले.

भारताने गेल्या दोन महिन्यांमध्ये ड्रॅगनची दुखरी नस दाबली आहे. चिनी मालावर अप्रत्यक्ष बहिष्कार, शेजारील राष्ट्रांशी व्यापारविषयक करारावर निर्बंध लावताना भारताने चीनला वेळोवेळी समज दिली. चीनचा कावेबाजपणा सुरूच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख, भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी चीनला वेगवेगळ्या शब्दांत भारताचा इरादा सांगितला. चीनने आतापर्यंत वेळकाढूपणा कायम ठेवला आहे.

Web Title: China's incursion into the border foiled, military readiness near Pangong Tso Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.