नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या काळात चीननेपाकिस्तानची मदत करण्यासाठी भारताची हेरगिरी केली होती, असा खुलासा एका अहवालातून करण्यात आला आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे आणि पाकिस्तानी एअरफोर्सचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करून पहलगाम हल्ल्याचा हिशेब बरोबर केला. लष्कराने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.
मात्र, लष्कराने छेडलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या काळात चीनने पाकिस्तानची मदत करण्यासाठी भारताची हेरगिरी केली होती, असा खुलासा अहवालातून करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित ‘सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज’ या थिंक टँक संस्थेच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरला अपयशी करून पाकिस्तानला विजयी करण्यासाठी चीनने पूर्ण जोर लावला होता. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचे मनसुबे उधळून लावले. पाकने चीनची मदत झाल्याची बाब नाकारली आहे, तर दुसरीकडे थिंक टँकच्या अहवालातून चीनने पाकिस्तानला धोरणात्मक, गुप्तचर आणि तांत्रिक मदत पुरविल्याचे स्पष्ट केले आहे.
चीनने काय केली मदत?अहवालानुसार, भारतीय सैन्याच्या हालचाली आणि जवानांच्या तैनातीची अचूक माहिती मिळविण्यासाठी पाकच्या एअर डिफेंस रडार यंत्रणेची दिशा नीट करण्यास चीनने मदत केली होती.
हल्ल्यानंतर भारताच्या हालचाली अचूक आणि स्पष्ट टिपता येतील अशा पद्धतीने पाकच्या उपग्रहाला स्थापित करण्यात चीनने मदत केली होती. अर्थात, पाकचे रडार अशा प्रकारे सेट केले होते की, हल्ल्याची माहिती पाकला आधीच मिळेल, असे थिंक टँक सीजेडब्ल्यूएसचे महासंचालक मेजर जनरल (निवृत्त) अशोक कुमार म्हणाले.