चीन आक्रमक पवित्र्यात! लडाखजवळ धावपट्टीचा विस्तार जोरात; लढाऊ विमानं तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 21:54 IST2020-05-26T21:46:54+5:302020-05-26T21:54:22+5:30
लडाखजवळील विमानतळावर मोठ्या प्रमाणात बांधकाम; दुसरी धावपट्टी तयार केली जात असल्याचं सॅटेलाईट फोटोंमधून समोर

चीन आक्रमक पवित्र्यात! लडाखजवळ धावपट्टीचा विस्तार जोरात; लढाऊ विमानं तैनात
नवी दिल्ली: लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना चीननं पँगाँग लेक परिसरापासून २०० किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. या भागात असलेल्या विमानतळावर चीनकडून बांधकाम सुरू असल्याचं दृश्य सॅटलाईटमधून घेण्यात आलेल्या फोटोंच्या माध्यमातून समोर आलं आहे. लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला चीन आणि भारताचं सैन्य आमनेसामने आलं. त्यावेळी वाद झाल्यानंतर दोन्ही देशांनी या भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात केला.
डेट्रेस्फानं (detresfa_) तिबेटमधल्या नगरी गुन्सा विमानतळाचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. यातील पहिला फोटो ६ एप्रिल २०२० रोजी काढण्यात आलेला आहे. तर दुसरा फोटो २१ मे रोजी टिपण्यात आला आहे. या दीड महिन्यांच्या कालावधीत चीननं मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचं दिसत आहे. नगरी गुन्सा विमानतळावर गेल्या महिन्यात एकच धावपट्टी होती. आता या भागात दुसऱ्या धावपट्टीचं काम अतिशय वेगानं सुरू असल्याचं दिसत आहे. लढाऊ विमानांसाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे. 'एनडीटीव्ही'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
तिसऱ्या फोटोमध्ये तयार धावपट्टीच्या शेजारील भागात असलेली लढाऊ विमानं अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. चिनी हवाई दलाची चार लढाऊ विमानं विमानतळावर तैनात ठेवण्यात आली आहेत. ही विमानं जे-११ किंवा जे-१६ असू शकतात, असा अंदाज आहे. जे-११/जे-१७ ची बनावट रशियाच्या सुखोई २७ सारखी आहे. भारतीय हवाई दलाचा विचार केल्यास जे-११/जे-१७ ची तुलना सुखोई ३० एमकेआय विमानांसोबत होऊ शकते.
डिसेंबर २०१९ मध्ये ही विमानं पहिल्यांदा विमानतळावर तैनात दिसली होती. आता त्यांचा जवळून काढलेला फोटो समोर आला आहे. त्यामधून ती जे-११/जे-१७ असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नगरी गुन्सा हवाई तळाचं भौगोलिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. या विमानतळाचा वापर सैनिकी कारवायांसोबतच नागरी उड्डाणासाठीही केला जातो. हा विमानतळ समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार २२ फुटांवर आहे. जगातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ अशी त्याची ओळख आहे.
ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात
पाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत