मोदींच्या स्वागतासाठी चीन उत्सुक; ७ वर्षांनी देणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 06:21 IST2025-08-10T06:21:16+5:302025-08-10T06:21:39+5:30
इकडे रशियासोबत लष्करी, सामरिक प्रकल्पांवर चर्चा

मोदींच्या स्वागतासाठी चीन उत्सुक; ७ वर्षांनी देणार भेट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा उभय देशांमधील संबंध अधिक मजबूत करेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) तियानजिन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे. चीनने त्यांच्या स्वागताची तयारी चालविली आहे.
पंतप्रधान मोदी चीनला जाण्यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी जपानलाही भेट देऊ शकतात. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही एससीओ बैठकांसाठी काही दिवसांपूर्वी चीनचा दौरा केला आहे.
पंतप्रधान मोदी सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर चीनला भेट देणार आहेत. यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये चीनचा दौरा केला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सांगितले की, एससीओ परिषदेत २० हून अधिक देशांचे नेते सहभागी होणार आहेत.
इकडे रशियासोबत लष्करी, सामरिक प्रकल्पांवर चर्चा
मॉस्को : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांची मॉस्को येथे भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील लष्करी आणि तांत्रिक संबंधांवर तसेच सामरिक क्षेत्रांमधील संयुक्त प्रकल्पांवर चर्चा झाली. डोवाल यांनी गुरुवारी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचीही भेट घेतली होती. बाहेरच्या दबावानंतरही रशियासोबत सर्व आघाड्यांवर सहकार्य सुरू ठेवण्याची भारताची वचनबद्धता डोवाल यांनी यावेळी व्यक्त केली. अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लावल्यानंतर डोवाल यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
द्विपक्षीय सहकार्यावर भर : डोवाल आणि मंटुरोव्ह यांच्या चर्चेत लष्करी-तांत्रिक सहकार्याबरोबरच नागरी विमान उत्पादन, धातू विज्ञान आणि रसायन उद्योगांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील संयुक्त प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
पुतीन यांना निमंत्रण : डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले ते पुतीन यांनी स्वीकारले.