भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:25 IST2025-08-08T13:25:13+5:302025-08-08T13:25:55+5:30
तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. फिलीपींसने त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा चीनने दिला आहे.

भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
बीजिंग - भारताच्या दौऱ्यावर आलेले फिलीपींसचे राष्ट्रपती फेरदिनांद मार्कोस ज्यूनिअर यांनी तैवानसोबत युद्धावरून मोठी घोषणा केली आहे. जर चीन आणि तैवान यांच्यात युद्ध झाले तर फिलीपींस त्यापासून दूर राहू शकत नाही असं त्यांनी म्हटले. जर तैवानसोबत युद्ध झाले तर अमेरिकन सैन्याला तुमच्या मालमत्तेचा आणि सैन्य ठिकाणांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी त्यांच्या देशाची महत्त्वाची भौगोलिक स्थितीचा उल्लेख केला. मार्कोस ज्यूनिअर यांच्या विधानानंतर चीनचा तीळपापड झाला आहे.
मार्कोस यांनी भारतीय माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चीन आणि तैवान युद्धाबाबत व्यावहारिक होण्याची गरज आहे. जर तैवानसाठी चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष झाला तर फिलीपींस यातून बाहेर राहील हा प्रश्नच येत नाही. त्यामागचे कारण म्हणजे आमची भौगोलिक स्थिती आहे. तैवानचा काओहसिंग परिसर फिलीपींसच्या लाओआगवरून विमानाने ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल, पूर्ण युद्ध सुरू झाले तर आम्ही त्यात सहभागी होऊ शकतो. तर निश्चितच आम्हाला आमचा भाग आणि अखंडतेचे रक्षण करावे लागेल असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय फिलीपींसचे लोक मोठ्या प्रमाणात तैवानमध्ये काम करतात. जर चीनने हल्ला केला तर फिलीपींसवर हे मोठे मानवी संकट असेल. तैवानमध्ये शेकडो फिलीपींसचे लोक आहेत. आम्ही आमच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा वापर करू असंही फिलीपींसचे राष्ट्रपती मार्कोस यांनी म्हटलं आहे. फिलीपींस राष्ट्रपतींच्या या विधानावर चीनचं परराष्ट्र मंत्रालय संतापले आहे. आम्ही त्यांच्या विधानाचा कडाडून विरोध करतो असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. फिलीपींसने त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील. फिलीपींस सातत्याने चुकीचं आणि उकसवणारे विधान करत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. फिलीपींसला तैवानमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या लोकांचा हवाला देत दुसऱ्या देशाच्या सांप्रदायिकेत हस्तक्षेप करण्याची गरज नाही. फिलीपींसने आगीशी खेळणे बंद करावे असा इशारा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.