तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 06:25 IST2025-10-31T06:25:00+5:302025-10-31T06:25:00+5:30
देशातील सर्व शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करणे सुरू

तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या वर्गापासून आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६-२७ पासून हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल.
उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारसह केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमात एआय विषय समाविष्ट केला जाणार आहे. पुढील दोन वर्षात तिसरीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करायचा आहे. यासाठी युद्धपातळीवर तयारी करावी लागणार आहे. अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यासाठी शिक्षकांना तयार करणे, या गोष्टी लवकरात लवकर कराव्या लागतील. असेही त्यांनी स्पष्ट केले.
एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
देशभरात एक कोटीपेक्षा जास्त शिक्षक आहेत. या शिक्षकांपर्यंत पोहोचणे आणि एआय शिकविण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करून तयार करणे, हे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागापुढचे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सध्या वर्गनिहाय एआय अभ्यासक्रम तयार करीत आहे. आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
शिक्षण मंत्रालयाने सध्याच्या शिक्षण व्यवस्थेला भविष्याभिमुख करण्याचे ठरविले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी तयार करणे, हा त्यामागचा हेतू आहे.
सध्या सीबीएसईच्या शाळांमध्ये सहावी ते १२ व्या वर्गापर्यंत एआय आधारित विषय शिकविला जात आहे.