बालविवाहांमुळे लव्ह जिहादला आळा बसेल- भाजप आमदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 09:03 IST2018-05-06T09:03:40+5:302018-05-06T09:03:40+5:30
भाजप आमदाराचं अजब तर्कट

बालविवाहांमुळे लव्ह जिहादला आळा बसेल- भाजप आमदार
भोपाळ: उशिरा होणाऱ्या विवाहांमुळेच लव्ह जिहादला बळ मिळत असल्याचा अजब दावा भाजपच्या आमदारानं केला आहे. इतकंच नव्हे, तर बालविवाहांमुळे लव्ह जिहादला आळा बसेल, असंही या आमदारानं म्हटलंय. पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. वर आणि वधू यांनी एकमेकांना पाहिलेलं नसतानाही ज्येष्ठ मंडळींकडून त्यांचं लग्न करुन दिलं जायचं. या प्रथेचं आपण समर्थन करत असल्याचं मध्य प्रदेशचे भाजप आमदार गोपाल परमार यांनी म्हटलं.
'पूर्वी मुलींचं वय 18 वर्षे होण्याआधीच त्यांचं लग्न करुन दिलं जायचं. मुलांचा विवाहदेखील 21 वर्षे पूर्ण होण्याआधीच केला जायचा. पूर्वी कमी वयातच मुलामुलांची लग्न ठरवली जायची. लवकर लग्न ठरवल्यामुळे मुलं चुकीच्या मार्गावर जाण्याचं प्रमाण कमी होतं. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याआधीच मुलांचं लग्न ठरवलं जायचं. मात्र आता मुलं कोचिंग क्लासला जातात. तिकडे ते लव्ह जिहादसारख्या सापळ्यांमध्ये अडकतात,' असं गोपाल परमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं. परमार मध्यप्रदेशमधील अगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
उशिरा होणारे विवाह लव्ह जिहादला जबाबदार असल्याचं अजब तर्कट परमार यांनी मांडलं. 'मुली अतिशय संवेदनशील असतात. त्यांना कोणी मदत करत असेल, तर त्या सहज फसतात. मग त्या त्यांचं नाव आणि त्यांची ओळख बदलण्यासाठी तयार होतात,' असं परमार म्हणाले. आपण स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तींचे विवाह बालपणीच ठरवले असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'माझा बालविवाह झालाय आणि माझ्या मुलांची लग्नदेखील मी त्यांच्या लहानपणीच ठरवली आहेत. मी माझ्या दोन मुली आणि एका मुलाचं लग्न सज्ञान होण्याआधीच ठरवलंय,' असं परमार म्हणाले. यामुळे माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आनंदात असल्याचंही त्यांना सांगितलं.