शिवसेनेच्या सुनावणीवेळी थेट केनियाचे सरन्यायाधीश येऊन बसले, 'केस' समजावताना चंद्रचूडही मिश्किल हसले

By मोरेश्वर येरम | Updated: March 14, 2023 15:54 IST2023-03-14T15:51:46+5:302023-03-14T15:54:10+5:30

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. होळीच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे.

Chief Justice of Kenya Martha K Koome present in the first bench of the Supreme Court to witness the Constitution Bench hearing in the ShivSena Case | शिवसेनेच्या सुनावणीवेळी थेट केनियाचे सरन्यायाधीश येऊन बसले, 'केस' समजावताना चंद्रचूडही मिश्किल हसले

शिवसेनेच्या सुनावणीवेळी थेट केनियाचे सरन्यायाधीश येऊन बसले, 'केस' समजावताना चंद्रचूडही मिश्किल हसले

नवी दिल्ली-

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. होळीच्या सुट्टीनंतर आजपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाकडून यावेळी युक्तिवाद सुरू असून राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही यावर आपली भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय गुंतागुंतीचं हे प्रकरण फक्त राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी दिशादर्शक असल्याचं म्हटलं जात आहे. आता तर इतर देशांचंही याप्रकरणाकडे लक्ष लागून राहिलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण शिवसेनेच्या सुनावणीवेळी आज सुप्रीम कोर्टात केनियाच्या सरन्यायाधीश आणि त्यांच्या वकिलांच्या टीमनं आवर्जुन उपस्थिती लावली.

केनियाच्या सरन्यायाधीश मार्था के. कूम त्यांच्या सहकारी वकिलांसोबत आज भारताच्या सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या खटल्याचं कामकाज पाहण्यासाठी पाहुणे म्हणून कोर्टरुममध्ये उपस्थित आहेत. आज सुप्रीम कोर्टाच्या लंच ब्रेकनंतर केनियाच्या सरन्यायाधीश आणि त्यांची टीम कोर्टरुममध्ये अगदी पहिल्या बेंचवर बसून संपूर्ण कामकाज पाहत होती. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केनियाच्या सरन्यायाधीशांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत देखील केलं. तसंच केनियाचे सरन्यायाधीश मार्था के. कूम यांची ओळख करुन दिली. 

"केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मार्था कूम या आमच्यामध्ये आज उपस्थित आहेत याचा आम्हाला खूप सन्मान वाटतो. त्या केनियाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत", असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. तसंच त्या उच्च शिक्षित असून त्यांनी भारतातील घटनात्मक कायद्याशी संबंधित मुद्द्यांसह विस्तृतपणे लिखाण केलं आहे. त्यांनी अलीकडेच केनियामध्ये मूलभूत संरचना सिद्धांत किती प्रमाणात लागू होईल यावर निर्णय दिला होता, असंही चंद्रचूड यांनी सांगितलं. 

केनियामध्ये LGBTQ अधिकारांना मान्यता देण्याचा निर्णय घेणाऱ्या खंडपीठाचा देखील मार्था कूम या भाग होत्या. चंद्रचूड यांनी कोर्ट रूममध्ये उपस्थित असलेल्या केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांचे देखील यावेळी स्वागत केले.

शिवसेनेच्या केसची दिली संक्षिप्त माहिती अन् मिश्किल हसले
भारतातील कोर्टरुमचं कामकाज पाहण्यासाठी आलेल्या केनियाच्या शिष्टमंडळाला यावेळी चंद्रचूड यांनी स्वत: शिवसेनेच्या संदर्भातील खटल्याची माहिती संक्षिप्त स्वरुपात दिली. तसंच सध्या नेमकं कोणत्या मुद्द्यावर युक्तिवाद सुरू आहे याचीही माहिती चंद्रचूड यांनी केनियाच्या सरन्यायाधीशांना दिली.

सरन्यायाधीश मार्था कूम यांना चेंबरमध्ये शिवसेनेच्या खटल्याबाबत संक्षिप्त माहिती देण्यात वेळ गेल्या त्यामुळे लंच ब्रेकनंतर यायला १० मिनिटं उशीर झाला असं कोर्टरुमला सांगताना चंद्रचूड मिश्किल हसले. "प्रकरण किती गुंतागुंतीचं आहे आणि आपण कोणत्या प्रकरणावर वाद घालत आहोत याचा शक्य होईल तितक्या संक्षिप्त पद्धतीनं मी त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे", असं चंद्रचूड मिश्किल हास्य करत म्हणाले. यानंतर कोर्टरुममध्ये सर्वांच्याच चेहऱ्यावर काहीकाळ स्मितहास्य पाहायला मिळालं. यावेळी सर्व उपस्थितांनी केनियाच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं. यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली.

Web Title: Chief Justice of Kenya Martha K Koome present in the first bench of the Supreme Court to witness the Constitution Bench hearing in the ShivSena Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.