२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:35 IST2025-12-19T15:34:12+5:302025-12-19T15:35:19+5:30
एक ट्रक अनियंत्रित होऊन उलटला आणि २०० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रक चालक सुमारे २४ तास ट्रकमध्येच अडकून राहिला होता.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सिल्लेवानी घाटात रविवारी सकाळी मक्याने भरलेला एक ट्रक अनियंत्रित होऊन उलटला आणि २०० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात ट्रक चालक सुमारे २४ तास ट्रकमध्येच अडकून राहिला होता. ट्रक मालकाने जीपीएसद्वारे ट्रकचा शोध घेतला, त्यानंतर सोमवारी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी क्रेन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला बाहेर काढलं. तब्बल तीन क्रेनच्या साहाय्याने आणि मोठ्या परिश्रमानंतर ट्रकला दरीतून बाहेर काढण्यात आलं. या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली असून, त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मोहखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उमरानाला चौकीचे प्रभारी पारस आर्मो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चांद भागातून मक्का भरलेले दोन ट्रक बोरगावच्या दिशेने जात होते. दोन्ही ट्रक एकाच मालकाचे होते आणि एकमेकांच्या मागे-पुढे चालले होते. यातील एक ट्रक सिल्लेवानी घाट ओलांडून पुढे गेला, मात्र मागचा ट्रक नियंत्रण सुटल्याने २५० फूट खोल दरीत कोसळला.
पुढे गेलेल्या ट्रकच्या चालकाने काही अंतरावर थांबून मागे पाहिलं असता त्याला दुसरा ट्रक दिसला नाही. त्याने चालकाला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र घाटात नेटवर्क नसल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर चालकाने मालकाला माहिती दिली. ट्रक मालक रवी बघेल यांनी जीपीएस ट्रॅक केले आणि ते घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केलं.