नक्षलवाद्यांनी प्रवासी बसला लावली आग, तीन जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 17:07 IST2019-01-16T16:57:25+5:302019-01-16T17:07:46+5:30
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी प्रवासी बसला आग लावली. गीदम पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कासुली गावाजवळील ही घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना अटक केली आहे.

नक्षलवाद्यांनी प्रवासी बसला लावली आग, तीन जणांना अटक
रायपूर - छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी प्रवासी बसला आग लावली. गीदम पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कासुली गावाजवळील ही घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना अटक केली आहे.
दंतेवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (16 जानेवारी) सकाळी एक प्रवासी बस गीदमहून छींदनारच्या दिशेनं रवाना झाली होती. ही बस जेव्हा कासुल गावाजवळ पोहोचली. त्यावेळेस नक्षलवाद्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत बस थांबवत 14 प्रवासी, चालक-वाहकाला बसमधून खाली उतरवलं.
प्रवासी, चालक-वाहकाला मारहाण करत, त्यांच्याकडील मोबाइल फोनदेखील नक्षलवाद्यांनी हिसकावून घेतले. यानंतर बस पेटवून दिली आणि नक्षलवादी तेथून फरार झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रवासांच्या लुटण्यात आलेल्या मोबाइल फोन्सच्या आधारे पोलिसांनी नक्षलवाद्यांचा पाठलाग केला.
पोलीस अधीक्षक पल्लव यांनी सांगितले की, कोरगावात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीदरम्यान तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. शिवाय, नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. चकमकीमध्ये काही नक्षलवादी जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. परिसरात सध्या शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.