अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:30 IST2025-11-10T13:28:42+5:302025-11-10T13:30:21+5:30
एटीएसने हैदराबादमधील डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सैयद आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केले आहे.

अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
Terror Attack: गुजरातच्या अँटी-टेररिझम स्क्वॉडने (ATS) एक मोठा दहशतवादी कट उधळत तिघांना अटक केली आहे. या गटाचा संबंध आयएसआयएस-खोरासान प्रांत (ISKP) या संघटनेशी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अटक केलेल्या मुख्य संशयितांपैकी एक हैदराबादचा डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सैयद आहे, जो रिसिन या अत्यंत घातक रासायनिक विषाचा वापर करुन अहमदाबाद, दिल्ली आणि लखनौमध्ये रासायनिक हल्ल्याची योजना आखत होता.
शस्त्रे आणि रासायनिक द्रव्य जप्त
एटीएसने कारवाईदरम्यान दोन ग्लॉक पिस्तुले, एक बेरेटा पिस्तुल, 30 जिवंत काडतुसे आणि 4 लिटर कॅस्टर ऑइल (रिसिन तयार करण्यासाठी वापरले जाणारे) जप्त केले. एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले की, ही कारवाई एक वर्ष चाललेल्या गुप्त तपास आणि निगराणीचे फळ आहे.
अशी झाली कारवाई
7 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद-मेहसाणा महामार्गावरील आदलज टोल प्लाझाजवळ एटीएसने एका सिल्व्हर फोर्ड फिगो कारला थांबवून मुख्य आरोपी डॉ. अहमद मोहिउद्दीन सैयद (35, हैदराबाद) याला अटक केली. चीनमधून एमबीबीएस केलेल्या सैयदवर अतिवादी विचारसरणीचा प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ahmedabad, Gujarat | Gujarat ATS arrested Dr Ahmed Mohiuddin Syed s/o Abdul Khadar Jeelani, Mohd Suhel s/o Mohd Suleman, Azad s/o Suleman Saifi.
— ANI (@ANI) November 9, 2025
They had been on the Gujarat ATS's radar for the past year. All three were arrested while supplying weapons. They were planning to… pic.twitter.com/mWhVKaf74T
उत्तर प्रदेशातून दोघे अटकेत
सैयदच्या मोबाइल आणि लॅपटॉपच्या फॉरेन्सिक तपासणीतून दोन अन्य आरोपींचा पत्ता लागला. यात आझाद सुलेमान शेख (20, शाहजहांपूर) आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम खान (23, लखीमपूर खीरी) यांचा समावेश आहे. या दोघांनी धार्मिक शिक्षण घेतलेले असून, राजस्थानच्या हनुमानगढ भागातून ड्रोनद्वारे पाकिस्तानातून आणलेल्या शस्त्रांची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिघेही गुजरातमध्ये शस्त्रांची देवाणघेवाण आणि रिसिन तयार करण्याच्या कटात सहभागी होते.
टेलिग्रामद्वारे पाकिस्तानी हँडलर संपर्कात
प्राथमिक चौकशीत सैयदने उघड केले की, तो अफगाणिस्तानस्थित आयएसकेपीच्या “अबू खादिजा” या हँडलरच्या संपर्कात होता. हा संपर्क टेलिग्राम अॅपद्वारे होत होता, जिथून त्याला हत्यारांची व्यवस्था, निधी आणि भरतीच्या सूचना दिल्या जात होत्या. ड्रोनमार्फत पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरुन पाठवलेली शस्त्रे त्याने गुजरातमधील कलोल येथे एका कब्रस्तानाजवळ गुप्त ठिकाणी प्राप्त केली होती. त्याचे अनेक पाकिस्तानी नागरिकांशीही संपर्क असल्याचे पुरावे सापडले आहेत.
दिल्ली, लखनौ आणि अहमदाबादमध्ये रेकी
एटीएसने सैयदच्या कॉल रेकॉर्ड आणि मेसेजेसमधून हे सिद्ध केले की, त्याने दिल्ली, लखनौ आणि अहमदाबादमधील संवेदनशील सरकारी आणि सार्वजनिक ठिकाणांची रेकी केली होती. सैयद फंड गोळा करुन नवे सदस्य भरती करण्याचा विचार करत होता. त्याने रिसिन तयार करण्याच्या प्रारंभिक प्रयोगांची तयारी सुरू केली होती, ज्यात उपकरणे, रसायने आणि संशोधनाचा समावेश होता.
काय आहे रिसिन?
रिसिन हे अत्यंत घातक विष असून श्वासावाटे, गिळल्यास किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात गेल्यास मृत्यू होतो. यावर कोणतेही विशिष्ट औषध नाही आणि हे आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घातलेल्या रासायनिक जैविक शस्त्रांच्या यादीत समाविष्ट आहे. सैयदच्या ताब्यातील 4 लिटर कॅस्टर ऑइल वापरुन मोठ्या प्रमाणात रिसिन तयार करता आले असते. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व्यक्तीकडून असा विषारी पदार्थ दहशतवादी उद्देशासाठी वापरण्याचा प्रयत्न म्हणजे जागतिक दहशतवादी नेटवर्कच्या नव्या रणनीतीचे संकेत आहेत. एटीएसने आता एनआयए, दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि इतर राज्यांच्या पोलिसांशी समन्वय सुरू केला आहे.
यूएपीए आणि आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल
गुन्हेगारांविरोधात अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) अॅक्ट (UAPA), भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैयदला 17 नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाने आयएसकेपीसारख्या जागतिक दहशतवादी संघटनांची भारतातील घुसखोरी उघड केली आहे, जी आता उच्चशिक्षित तरुणांना टार्गेट करत आहेत. दरम्यान, गुजरात एटीएसच्या कारवाईने मोठी दुर्घटना टळली, मात्र ही घटना देशात अधिक सजग सुरक्षा यंत्रणेची गरज अधोरेखित करते.