अशीही पळवापळवी, लालूपुत्राच्या विवाहात राजद कार्यकर्त्यांचे 'प्रताप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 10:57 IST2018-05-13T10:57:15+5:302018-05-13T10:57:15+5:30

खाद्यपदार्थांची पळवापळवी आणि वस्तूंची मोडतोड झाल्यामुळे या समारंभाला गालबोट लागले. 

Chaos at Tej Prataps wedding unruly crowd loots food items crockery | अशीही पळवापळवी, लालूपुत्राच्या विवाहात राजद कार्यकर्त्यांचे 'प्रताप'

अशीही पळवापळवी, लालूपुत्राच्या विवाहात राजद कार्यकर्त्यांचे 'प्रताप'

पाटणा- लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यांचा बहुचर्चित विवाह सोहळा पार पडला खरा पण त्यांच्या राजद पक्षाने तो आणखी प्रसिद्ध होईल अशी कामगिरी सोहळ्याच्यावेळेस करुन दाखवली. तेज प्रताप यांचा विवाह राजदचे आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी झाला. पण खाद्यपदार्थांची पळवापळवी आणि वस्तूंची मोडतोड झाल्यामुळे या समारंभाला गालबोट लागले. 

तेजप्रताप यांच्या विवाहाला हजारो लोक उपस्थित  होते. सुरक्षेच्या कारणास्तव व्हीआयपी पाहुणे व माध्यमांचे प्रतिनिधी यांना विशेष सोय करण्यात आली होती व त्यांच्या आणि इतर पाहुण्यांमध्ये अडथळे लावले होते. मात्र तेजप्रताप यांनी ऐश्वर्या यांना पुष्पमाला घालताच राजदचे कार्यकर्ते एकच गोंधळ घालत आरडाओरडा करत खाद्यपदार्थ, वस्तूंवर तुटून पडले. बहुतेकांनी पदार्थ आणि क्रॉकरी लुटून नेली. काहींनी त्याची मोडतोड केली. जेवणाच्या केटररने आपली अनेक भांडी गायब झाल्याचे सांगितले. याशिवाय अनेक वस्तू मोडूनही टाकण्यात आल्या आहेत. सर्व परिसरात उलट्यासुलट्या पडलेल्या खुर्च्याही दिसून येत होत्या. माध्यमांच्या प्रतिनिधींनीही आपल्याशी कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याचे सांगितले व आपल्या उपकरणांची मोडतोड झाल्याचे सांगितले.

तेजप्रताप यांचा हा विवाहसोहळा आधीपासूनच चर्चेत होता, या हुल्लडबाजीमुळे तो आता अधिकच चर्चेत राहील. तेजप्रताप बिहारचे माजी आरोग्यमंत्री होते. 
 

Web Title: Chaos at Tej Prataps wedding unruly crowd loots food items crockery