भाजपशासित राज्यांत फेरबदल? नवीन फळी उभारणार, वरिष्ठ नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:11 AM2021-07-19T06:11:30+5:302021-07-19T06:12:43+5:30

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत  आहेत.

changes in BJP ruled states and senior leadership will discuss with the chief minister | भाजपशासित राज्यांत फेरबदल? नवीन फळी उभारणार, वरिष्ठ नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

भाजपशासित राज्यांत फेरबदल? नवीन फळी उभारणार, वरिष्ठ नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

googlenewsNext

नितीन अग्रवाल

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत  आहेत. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीतून फेरबदलाची चर्चा जोरात असून भाजशासित राज्यांतही मोठ्या प्रमाणावर बदल होऊ शकतात.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, कर्नाटकचे  मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा,  त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यावरून फेरबदलाचे संकेत मिळतात.

सूत्रांनुसार भाजपशासित राज्यांसोबत बिगर भाजपशासित राज्यांचाही आढावा घेतली जात आहे.  कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान प्राप्त माहिती आणि पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये विचारमंथन केले जात आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासह पक्ष संघटना मजबूत करण्याच्या योजनेवर काम होत आहे.

मध्य प्रदेश, कर्नाटकचा होणार निर्णय

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी आणि शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर या दोन राज्यांत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, असे बोलले जाते. २६ जुलै रोजी येदियुरप्पा सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सत्तेत मोठा बदल होऊ शकतो. येदियुरप्पांनी राजीनाम्याशी संबंधित वृत्त फेटाळले आहे.

महाराष्ट्रातही बदल होण्याची शक्यता...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी दिल्ली दौऱ्यात वरिष्ठ नेत्यांची घेतलेल्या भेटीवरून महाराष्ट्रातही संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, असे संकेत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात चार मंत्र्यांचा समावेश करून महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात आले आहे; त्यावरून पक्ष महाराष्ट्राबाबत अत्यंत गंभीर असल्याचे दिसते.

Web Title: changes in BJP ruled states and senior leadership will discuss with the chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.