काळानुरुप कार्यशैली बदला
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:12+5:302015-02-16T23:55:12+5:30
राज ठाकरेंची पाठशाला : कार्यकर्त्यांना सल्ला

काळानुरुप कार्यशैली बदला
र ज ठाकरेंची पाठशाला : कार्यकर्त्यांना सल्ला पिंपरी : वॉर्डात समाजकारण कसे करावे, लोकांशी संपर्क कसा ठेवावा, समाजातील प्रतिष्ठित लोकांशी वैयक्तिक संपर्क कसा वाढवावा आदीबाबत मार्गदर्शन करीत, जुन्या पद्धतीने काम करणे सोडून नव्या युगातील तरुणाईला बदलत्या परिस्थितीनुसार कार्यशैली आत्मसात करावी, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. बर्याच मोठ्या कालावधीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये वेळ देण्यासाठी ते आवर्जून आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. ठाकरेंची ही पाठशाला चिंचवड येथे सोमवारी सुमारे साडेतीन तास चालली. विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे यांनी राज्यातील काही शहरांचा दौरा केला. पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा शिल्लक होता. तो सोमवारी घाईघाईतच पूर्ण झाला. चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये बंद दाराआड त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांची पाठशाला घेतली. सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्याचे चिंचवड येथे आगमन झाले. वरिष्ठ पदाधिकार्यांशी चर्चा करुन प्रथम चिंचवड विधानसभा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दुसर्या टप्प्यात पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघाचा एकत्रितपणे संवाद झाला. या वेळी मावळ मतदारसंघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.पक्ष, अडचणी आणि समस्यांबाबत विचारलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. लेखी निवेदन स्वीकारले. पदाधिकार्यांशी ओळख करून घेऊन, विभाग आणि वॉर्डाची लोकसंख्या पाठोपाठ मतदारसंख्या विचारली. 'वॉर्डातील लोकांचे मोबाईल क्रमांक मिळवा. कोणाचा कधी वाढदिवस आहे, आदी माहिती संग्रहित करा. या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क ठेवा. त्याच्या सुख-दु:खात सहभागी व्हा. समाजातील प्रतिष्ठित लोकांशी स्नेहाचे संबंध ठेवा. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पत्रकार, पोलीस आदींशी वैयक्तिक संबंध ठेवा. माध्यमाशी अधिक जवळीक निर्माण करा. पुस्तक आणि वृत्तपत्राचे नियमित आणि अभ्यासपूर्वक वाचन करा,'असा सल्ला त्यांनी दिला. 'सध्याचे राजकारण हे जास्तीत जास्त पुढील १० वर्षे टिकून राहील. नवी पिढी खूपच बदलली आहे. त्यांच्या पद्धतीने काम करण्याची तयारी करुन घ्या अन्यथा ते उभेसुद्धा करणार नाहीत,' असा इशारा त्यांनी दिला. 'वाढदिवसाचे फ्लेक्स न लावण्याचे सांगितले आहे. तरीही अनेक जण ऊठ-सूट फ्लेक्स लावत आहेत. स्वत:चे आणि दुसर्याचे मोठमोठे फ्लेक्स झळकतात. चांगल्या लोकांच्या वाढदिवसाची तारीख नागरिकांना माहिती असते. वाढदिवसापेक्षा केलेल्या कामाचे फ्लेक्स लावा, अशी ताकीद त्यांनी दिली. ----