वीरेंद्र सेहवागच्या फरार भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कोर्टात हजर केल्यावर जामिनासाठी केला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:50 IST2025-03-07T09:49:53+5:302025-03-07T09:50:30+5:30
भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवागच्या भावाला चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे.

वीरेंद्र सेहवागच्या फरार भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कोर्टात हजर केल्यावर जामिनासाठी केला अर्ज
Virender Sehwag Brother: भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग सध्या अडचणीत सापडला आहे. वीरेंद्र सेहवागचा लहान भाऊ विनोद सेहवाग याला चंदिगड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर सेहवागच्या भावाला चंदीगडच्या मनीमाजरा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अटक केली. चेक बाऊन्स प्रकरणी न्यायालयात हजर न झाल्याने विनोद सेहवागला फरार घोषित करण्यात आले होते. अटकेनंतर विनोद सेहवागला कोर्टात हजर केल्यानंतर त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. विनोद सेहवागच्या जामीन अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या भावाला चंदीगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. कोर्टाने फरार घोषित केल्यानंतर विनोद सेहवागला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी विनोद सेहवागला कोर्टात हजर केले, जिथे त्याच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला. मात्र, पोलिसांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला. विनोद सेहवागविरुद्ध चंदीगड जिल्हा न्यायालयात ७ कोटी रुपयांचा चेक बाऊन्सचा खटला सुरू आहे. हिमाचलच्या बद्दी येथील श्री नैना प्लॅस्टिक या कंपनीने दिल्लीतील जाल्टा फूड अँड बेव्हरेजेस आणि तिचे तीन संचालक विनोद सेहवाग, विष्णू मित्तल आणि सुधीर मल्होत्रा यांच्या विरोधात हा खटला दाखल केला होता.
गेल्या वर्षी या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने विनोद सेहवागसह तीन संचालकांना आरोपी म्हणून कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र आता त्यांनी कोर्टाच्या समन्सच्या आदेशाविरोधात सत्र न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. याचिकेत मला आरोपी बनवण्याचा निर्णय चुकीचा होता. मी या कंपनीत संचालक किंवा कर्मचारी नाही. कंपनीच्या दैनंदिन व्यवहारात माझी कोणतीही भूमिका नाही, असं विनोद सेहवागने म्हटलं होतं.
श्री नैना प्लास्टिक कंपनीचे वकील विकास सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाल्टा कंपनीने त्यांच्या कंपनीला काही सामान पुरवण्याची ऑर्डर दिली होती. या सामानाची किंमत अंदाजे ७ कोटी रुपये होती. या बदल्यात जाल्टा कंपनीने जून २०१८ मध्ये तक्रारदार कंपनीला एक एक कोटी रुपयांचे सात चेक दिले होते. पण अकाऊंटमध्ये पैसे नसल्याने ते बाऊन्स झाले. तक्रारदार कंपनीने जाल्टा कंपनीला हा सगळा प्रकार सांगितला. दोन महिने उलटूनही चेक क्लिअर न झाल्याने तक्रारदारांनी जाल्टा कंपनी व संचालकांविरुद्ध कायदेशीर नोटीस देऊन पंधरा दिवसांत पैसे देण्याची मागणी केली. कायदेशीर नोटीस देऊनही कंपनीने पैसे दिले नाही तेव्हा तक्रारदारांनी चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल केला.
याआधी कनिष्ठ न्यायालयाने विनोद सेहवागसह तीन आरोपींना हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र तरीही ते कोर्टात हजर झाले नाहीत. त्यावर न्यायालयाने त्यांचे जामीनपात्र व नंतर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतरही ते कोर्टात न आल्याने त्यांना फरारी घोषित करण्यात आलं. त्यानंतर २२ जुलै २०१९ रोजी विनोद सेहवाग यांनी कोर्टात हजर राहत २ लाख रुपयांच्या जातमचुलक्यावर जामीन घेतला होता.