हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:56 IST2025-09-20T13:55:28+5:302025-09-20T13:56:12+5:30
गावात अचानक आलेल्या पुराचा विध्वंस पाहायला मिळाला. अनेक लोक त्यांच्या घरात गाडले गेले. याच दरम्यान जुळ्या मुलांसह त्यांच्या आईचाही मृत्यू झाला.

फोटो - आजतक
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नंदानगर येथील कुंतरी लगा फाली गावात अचानक आलेल्या पुराचा विध्वंस पाहायला मिळाला. अनेक लोक त्यांच्या घरात गाडले गेले. याच दरम्यान जुळ्या मुलांसह त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. शुक्रवारी जेव्हा तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तेव्हाच दृश्य पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं. मुलं आपल्या आईला मिठी मारून होती.
चमोली येथे आपत्ती आली तेव्हा कांता देवी तिच्या जुळ्या मुलांसह ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या होत्या. बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढले तेव्हा मुले त्यांच्या आईला घट्ट मिठी मारून होती. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचं मन हेलावून गेलं. रिपोर्टनुसार, दहा वर्षांचा विकास आणि विशाल चौथीत शिकत होते. बुधवारी आपत्ती आली तेव्हा कांता देवी आणि कुंवर सिंह त्यांच्या जुळ्या मुलांसह घरी होते.
अचानक आलेल्या पुरामुळे सर्वजण आतमध्ये अडकले. बचाव पथकांनी १६ तासांनंतर ४२ वर्षीय कुंवर सिंह यांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढलं. मात्र त्यांची पत्नी आणि दोन्ही जुळ्या मुलांना आपला जीव गमवावा लागला. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पावसाने उद्ध्वस्त झालेल्या गावांमधून शुक्रवारी आणखी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या भागात भूस्खलन आणि पुरामुळे मृतांची संख्या सातवर गेली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील नंदनगर आधीच भूस्खलनाचा सामना करत आहे. पुरामुळे आणि मुसळधार पावसामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून लोकांना याचा फटका बसला आहे.