देशात १०० फूड टेस्टिंग लॅब उघडणार, खाद्य निर्यातीला चालना मिळणार; चिराग पासवान यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:31 IST2025-01-09T12:30:34+5:302025-01-09T12:31:06+5:30
प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले.

देशात १०० फूड टेस्टिंग लॅब उघडणार, खाद्य निर्यातीला चालना मिळणार; चिराग पासवान यांची माहिती
नवी दिल्ली : चवीला सीमा लागत नाहीत. भारतीय पाककृतींमध्ये सीमा ओलांडण्याची ताकद आहे. आम्ही जगभरात आपली शेती आणि खाद्य निर्यात वाढवण्याच्या विचारांसह पुढे जात आहोत, असे केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले. इंडस फूड २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रक्रिया केलेले अन्न हे आपले भविष्य आहे. त्यांची वाढती मागणीच विकासासाठी प्रचंड शक्यता निर्माण करते. त्यामुळे तुमच्या जेवणाच्या विविध चवी जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जा आणि भारताच्या अनोख्या पाककृतींना जगातील अॅम्बेसिडर बनवा. प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत भारताला अग्रगण्य देश बनवा आणि विकसित भारताच्या दिशेने योगदान द्या, असे चिराग पासवान म्हणाले.
अन्न सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही निर्यातीला प्रोत्साहन देत १०० नवीन अन्न चाचणी प्रयोगशाळा (फूड टेस्टिंग लॅब) उघडणार आहोत. गेल्या काही वर्षांत, इंड्स फूड हे भारतातील सर्वोत्तम आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त व्यापार प्रदर्शनांपैकी एक म्हणून उदयास आले आहे, ज्यामुळे एफ अँड बी क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे चिराग पासवान यांनी सांगितले.
प्रक्रिया केलेल्या अन्नाची मागणी अनेक पटींनी वाढेल - चिराग
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि बदलत्या कुटुंब रचनेमुळे प्रक्रिया केलेल्या अन्नाची मागणी अनेक पटींनी वाढेल आणि भविष्यातील हे लक्ष्य आहे. कारण त्यात वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे, असे चिराग पासवान म्हणाले. दरम्यान, या तीन दिवसांच्या इंडस फूड २०२५ कार्यक्रमात ३० देशांतील २३०० हून अधिक प्रदर्शक आणि ७५०० आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होत आहेत.
सर्व तयार अन्न उत्पादने निर्यात करणार - बाबा रामदेव
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बाबा रामदेव देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, प्रयागराज महाकुंभाच्या आधी हा 'आहार कुंभ' आहे. आम्ही जगभरात भारताचे विचार, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीची विविधता प्रदर्शित करत आहोत आणि त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच, आम्ही 'फार्म टू फ्रीज' ही एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. यामध्ये आम्ही सर्व तयार अन्न उत्पादने निर्यात करणार आहेत. भारतातील आहार, विचार आणि वर्तनामुळे जगभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे बाबा रामदेव म्हणाले.