लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात तात्पुरते बंद करण्यात आलेल्या ३२ विमानतळांवर नागरी उड्डाणे पुन्हा सुरू होतील, अशी घोषणा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) सोमवारी केली.
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे ९ मे ते १५ मे पर्यंत स्थगित करण्यात आली होती. शनिवारी भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीस सहमती दर्शविली.
सोमवारी एका निवेदनात, सरकारी मालकीच्या एएआयने म्हटले आहे की १५ मे रोजी संध्याकाळी ५.२९ वाजेपर्यंत नागरी विमानांच्या ऑपरेशनसाठी बंद असलेली ३२ विमानतळे आता तत्काळ प्रभावाने ऑपरेशनसाठी उपलब्ध आहेत. प्रवाशांना विमान कंपन्यांकडून थेट उड्डाण संबंधित माहिती घेण्याचा आणि अद्ययावत माहितीसाठी नियमितपणे विमान कंपन्यांच्या वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
श्रीनगर विमानतळ उड्डाणांसाठी सज्ज
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ३२ विमानतळांवरून नागरी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणांसाठी सज्ज झाले आहे. श्रीनगर विमानतळ बंद झाल्यामुळे श्रीनगरहून हज उड्डाणांवरही परिणाम झाला.
दिल्लीत वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता
दिल्ली विमानतळ प्रशासनाकडून सोमवारी सांगण्यात आले की, सध्या उड्डाणे सुरळीत सुरू आहेत. परंतु, बदलत्या हवाई परिस्थिती आणि वाढत्या सुरक्षा उपायांमुळे, काही उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. रविवारी दिल्ली विमानतळावरून सुमारे १०० विमाने रद्द करण्यात आली.
चंडीगड विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर सोमवारी चंडीगड विमानतळावरून विमानसेवा पुन्हा सुरू झाली. १२ मे २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून चंडीगड येथील शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा सुरू झाले आहे.