महिलांची सुरक्षा आणि सन्मानालाच केंद्र सरकारने दिले सर्वोच्च प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:28 IST2025-03-09T12:27:54+5:302025-03-09T12:28:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; बलात्काऱ्यांना फाशीसाठी कायद्यांत केली सुधारणा

महिलांची सुरक्षा आणि सन्मानालाच केंद्र सरकारने दिले सर्वोच्च प्राधान्य
नवसारी : गेल्या दहा वर्षात आमच्या सरकारने महिलांची सुरक्षा व सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. बलात्कारासारख्या अपराध्यांसाठी फाशीची शिक्षा देण्यासाठी कायद्यांमध्ये सुधारणा केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारी जिल्ह्यातील वंसी बोरसी गावात आयोजिलेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.
त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण होणे आवश्यक आहे. देशाचा आत्मा हा गावांमध्ये आहे, असे महात्मा गांधी म्हणायचे. आमचे सरकार महिलांच्या विकासासाठी काम करते. तिहेरी तलाक विरोधात केंद्र सरकारने कडक कायदा लागू केला व लाखो मुस्लीम महिलांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. गावांमध्ये हजारो शौचालये बांधली व अन्य विकासाच्याही योजना राबविल्या. महिलांसह अनेक घटकांना या सर्व गोष्टींचे फायदे झाले आहेत.
'मी जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती'
पंतप्रधान म्हणाले की, लाखो मायभगिनींचे आशीर्वाद मला लाभले. मी या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. अमूल, लिज्जत पापडसारखे ब्रँड हे महिलांच्या यशस्वी व्यवसायांचे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
२.५ लाख महिलांना ४५० कोटींची रक्कम वितरित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात 'लखपती दीदी' योजनेतील महिला लाभार्थ्यांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने वंसी बोरसी गावात 'लखपती दीदी संमेलन' आयोजित करण्यात आले.
त्यावेळी २५,००० हून अधिक स्वयंसहायता गटांच्या २.५ लाख महिलांना ४५० कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली. यावेळी लखपती दीदींनी आपले अनुभव सांगितले.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, नवसारीचे खासदार सी. आर. पाटील हे उपस्थित होते. नवसारी येथील कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने तेथील सुरक्षा व्यवस्थेची सूत्रे महिला पोलिसांच्या हाती सोपविण्यात आली होती.
सोशल मीडियाची जबाबदारी महिलांकडे
राष्ट्रीय महिला दिनानिमित्त शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया हँडलची जबाबदारी महिलांनी स्वीकारली. त्यांनी आपले अनुभव सांगितले.
बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर वैशाली, शेतकरी-उद्योजक अनिता देवी, अणुशास्त्रज्ञ एलीना मिश्रा, अंतराळ शास्त्रज्ञ शिल्पी सोनी, एका संस्थेच्या संस्थापक अंजली अग्रवाल आणि ग्रामीण उद्योजक अजयिता शाह यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया खात्यांची जबाबदारी स्वीकारली.
महिलांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याचा संदेश बुद्धिबळपटू आर. वैशाली यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया पेजवर युजर्सही मोठ्या संख्येने भेट देत असतात तसेच आपली मते, निरीक्षणेही नोंदवित असतात.