भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:14 IST2025-11-10T16:14:22+5:302025-11-10T16:14:49+5:30
२०२१ मध्ये सरकारने दरवर्षी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान एक विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
नवी दिल्ली - सरकारी कार्यालयात ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात सरकारला भंगार विकून ८०० कोटीहून अधिक कमाई झाली आहे. ही रक्कम इतकी जास्त आहे की त्यातून ७ वंदे भारत ट्रेन खरेदी केल्या जाऊ शकतात. या अभियानातून जवळपास २३३ लाख वर्ग फूट जागा रिकामी झाली आहे. मागील ५ वर्षात अशा अभियानातून सरकारने भंगार विकून एकूण ४१०० कोटी रूपये कमाई केली आहे. ही रक्कम एखाद्या मोठ्या स्पेस मिशन अथवा चंद्रयान मिशनच्या एकूण बजेट एवढी आहे.
भंगारातून पैसा
केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, या स्वच्छता मोहिमेदरम्यान सरकारी संस्था आणि त्यांच्या उपकंपन्यांनी ९२.३ दशलक्ष चौरस फूट जागा मोकळी केली आहे. गेल्या पाच विशेष मोहिमेत मोकळी केलेली एकूण जागा एक मोठा मॉल किंवा इतर मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी पुरेशी आहे. २०२१ मध्ये सरकारने दरवर्षी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान एक विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
८४ केंद्रीय मंत्रालये आणि विभाग एकत्र करतात काम
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग या अभियानाचे समन्वय साधतो, ज्यामध्ये ८४ केंद्रीय मंत्रालये आणि विभागांचा समावेश आहे. या मोहिमेच्या यशाची खात्री करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि अनुशेष कमी करण्यासाठी आढावा बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे सचिव आणि महासंचालकांना कामे सोपवण्यात आली. त्यांना दर आठवड्याला मोहिमेचा आढावा घेणे आणि अनुशेष कमी करणे आवश्यक होते.
कशी राबवली स्वच्छता मोहिम?
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला सरकारी कार्यालयांबाहेरील परिसर स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांना एकत्रित करावे लागले. प्रत्येक मंत्रालय आणि विभागाने स्वच्छता राखली पाहिजे असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या विशेष एक महिन्याच्या मोहिमेदरम्यान कागदी फाईलींची संख्या कमी करणे आणि प्रलंबित प्रकरणे सोडवणे याला प्राधान्य दिले जाते. शिवाय, रद्दीचे उत्पन्नात रूपांतर करण्यावर विशेष भर दिला जातो.