प्रजासत्ताक सोहळा पाहण्यासाठी दिल्लीकरांची ‘परेड’, दोन किमीपर्यंत रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 01:14 IST2020-01-27T01:14:15+5:302020-01-27T01:14:33+5:30
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांच्या चेहऱ्यावर इंडिया गेटकडे जाताना उत्साह दिसत होता.

प्रजासत्ताक सोहळा पाहण्यासाठी दिल्लीकरांची ‘परेड’, दोन किमीपर्यंत रांगा
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अनुभवण्यासाठी आलेल्या दिल्लीकरांचा उत्साह रविवारी पहायला मिळाला. संचलनाला उपस्थित राहण्यासाठी नागरिकांनी सकाळी साडेपाच वाजल्यापासून जनपथ येथे रांगा लावल्या होत्या. दोन किलोमीटरपर्यंत लागलेल्या या रांगांमुळे नागरिकांना मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी ‘परेड’ करावी लागत होती. मात्र, तरीही गर्दी, अंतर, थंडी यांची तमा न बाळगता हजारो दिल्लीकरांनी जनपथ येथे एकवटले होते.
सकाळपासूनच संपूर्ण ल्यूटियन्स झोनमधून लोकांची राजपथकडे जाण्याची लगबग दिसत होती. पारंपरिक वेशभूषा केलेले लोक, हतात तिरंगा घेतलेली लहान मुलेही गर्दीत मिसळली होती.
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांच्या चेहऱ्यावर इंडिया गेटकडे जाताना उत्साह दिसत होता. हातात तिरंगा, चेहºयावर राष्ट्रध्वज रेखाटलेल्या तरुण-तरुणींची ठिकठिकाणी गर्दी होती. ल्यूटियन्स झोनमधील विविध मार्गांवर दिल्ली वाहतूक पोलीस सकाळपासूनच तैनात होते. लोकांना जनपथकडे जाताना त्यांची मदत होत होती. अनेक मार्ग बंद असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त होता.
रफी मार्ग, जनपथ, मानसिंग रोड, तिलक मार्ग, बहादूर शहा जफर मार्ग आणि नेताजी सुभाष मार्गही बंद ठेवण्यात आला होता. इंडिया गेट ते जनपथदरम्यान अनेकजण राजपथावर प्रवेश मिळवण्यासाठी प्रतीक्षा करत होते. गर्दी पुढे सरकत होती तसा रांगेतील लोकांचा उत्साह आणखी वाढत होता. लोकांवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची मात्र दमछाक होत होती. राजपथ येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे मुख्य प्रवेशद्वार लवकर बंद करण्यात आले. त्यामुळे पास असल्याने आपल्याला प्रवेश मिळेल, अशी आशा बाळगून आलेल्यांची निराशा झाली.
मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यानंतरही अनेकांनी नवीन महाराष्ट्र सदनापासून पुढे तिलक मार्गावर उपस्थिती लावली. येथे संचलन करून परतणाºया जवानांचा उत्साह वाढवताना ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. छायाचित्रे, व्हिडिओ काढणारे अनेक हात गर्दीतून डोकावत होते. राजपथावरून परतणाºया विविध राज्यांच्या चित्ररथांनाही उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. वायूदल, नौदल, आयटीबीपी केंद्रीय राखीव पोलीस दल यांचे संचलन सुरू असताना नागरिक घोषणा करून त्यांचा उत्साह वाढवत होते.
दुपारी वाहतूक सुरळीत
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत चार स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत सहा हजार अधिकारी तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे निमलष्करी दलाच्या ५० तुकड्या नियुक्त करण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलीस उपायुक्त इश सिंघल यांनी दिली. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रो स्थानके आणि बंद असलेले रस्तेही दुपारी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले.