गेले तीन-चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर आज अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर झाला होता. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून युद्धविरामाला सुरुवात होऊन काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबारास सुरुवात केली, एवढंच नाही तर पाकिस्तानने जम्मू आणि श्रीनगर भागात मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला केला. पाकिस्तानच्या या आगळीकीनंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून हल्ला सुरूच ठेवल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये ओमर अब्दुल्ला म्हणाले की, युद्धविरामाचं काय झालं? श्रीनगरमध्ये चहुबाजूंनी स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये युद्धविराम कुठेच दिसत नाही आहे.
दरम्यान, युद्धविरामाला काही तास उलटण्यापूर्वीच पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा येथे गोळीबार सुरू केला आहे. बारामुल्ला येथेही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. जम्मूमधील बहुतांश भागात ब्लॅकआऊट घोषित करण्यात आला आहे. पठाणकोटमध्येही हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ब्लॅकआऊट करावा लागला आहे. श्रीनगरमध्ये स्फोटांची मालिका सुरू असून, अँटी ड्रोन सिस्टिमद्वारे ड्रोननां लक्ष्य करण्यात येत आहे. श्रीनगरमधील लष्करी मुख्यालयाजवळ चार ड्रोन नष्ट करण्यात आले आहेत. तसेच काही तासांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.