सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर तीन तासांत पाकिस्तानी सैन्याने शनिवारी रात्री सलग तीन तास शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे त्यांना महागात पडले आहे. या तीन तासांत लडाख ते भूजपर्यंत ड्रोन हल्ल्यांनी भारतीय जनतेत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला असता एलओसीवर पाकिस्तानला १६ सैनिक गमवावे लागले. भारतीय बाजूने केलेल्या कारवाईत पाकचे ८ बंकर व ६ सीमा चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.
सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत एलओसी व आंतरराष्ट्रीय सीमेवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले केले. याला भारताने जोरदार उत्तर दिले असून, यात पाकचे १६ जवान ठार झाले. तसेच ८ फॉरवर्ड बंकर व ६ सीमा चौक्या नष्ट केल्या. शस्त्रसंधी उल्लंघनानंतर तीन तासांत भारतालाही थोडी झळ सोसावी लागली आहे. याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.
मुजोर पाकिस्तानचे कुठे, कसे अन् किती नुकसान?
नवी दिल्ली : शनिवारी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना शत्रूच्या अनेक हवाई तळांवर आणि हवाई संरक्षण रडार यंत्रणांवर हल्ले करून तेथील यंत्रणा उद्ध्वस्त केली. रविवारी भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी एका संयुक्त पत्रपरिषदेत नकाशे आणि छायाचित्रांतून हल्ला केलेल्या ठिकाणांचे नुकसान दर्शवले. हवाई दलाने हल्ला चढवलेल्या पाकिस्तानी हवाई तळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या हल्ल्यांसाठी भारतीय हवाई दलाने लढाऊ जेट विमाने, मानवरहित ड्रोन, तसेच क्षेपणास्त्रांचा वापर केला. केवळ हवाई तळच नव्हे, तर पाकिस्तानची तांत्रिक पायाभूत यंत्रणा, नियंत्रण कक्ष, रडार साइट आणि शस्त्रागारावरही हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात आले.