दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:38 IST2026-04-13T16:34:13+5:302026-04-13T16:38:22+5:30
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय भारतातील हेरगिरी वाढवत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे चिनी बनावटीचे सीसीटीव्ही यासाठी वापरले जात आहेत.

दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
ऑपरेशन सिंदूरमध्ये जोरदार तडाखा बसल्यानंतर पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेकडून आता हेरगिरी क्षमता वाढवली जात आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआय भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या हालचाली, जवानांची तैनाती, शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या ठिकाणांचे व्हिडीओ मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. भविष्यात भारतासोबत कुठला लष्करी संघर्ष झाला, तर त्यासाठी ही माहिती मिळवली जात असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
'आजतक'ने सुरक्षा ग्रिडच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात पाकिस्तानी आयएसआयचा हेतू ऑपरेशन सिंदूरनंतर स्वतःची ट्रॅकिंग प्रणाली आणि क्षमता अधिक चांगल्या पद्धतीने तयार करण्याचा आहे.
आयएसआयने हेरगिरीसाठी निवडली ही पद्धत
आयएसआयने नवा मार्ग हेरिगिरीसाठी अवलंबला आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या EseeCloud CCTV कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. सूत्रांनी सांगितले की, सीसीटीव्हीशी संबंधित हे प्रकरण सीमा सुरक्षा दलाच्या जी शाखेने केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसमोर मांडला होता. पाकिस्तानमध्ये असलेल्या एका हेराने इशारा दिला होता की, पाकिस्तान भारतातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काम करत आहे.
११ संशयितांना दिल्ली पोलिसांनी केली अटक
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आणि मोहीम चालवली. दिल्ली आणि पंजाबमधून दिल्ली पोलिसांनी ११ संशयितांना अटक केली. पोलिसांनी टाकलेल्या धाडींमध्ये ९ असे सौरऊर्जेवर चालणारे सीसीटीव्ही जप्त करण्यात आले आहेत, ज्यामध्ये सीम कार्ड लावलेले होते.
हे सीसीटीव्ही संवेदनशील कार्यालये आणि ठिकाणांच्या जागी लावलेले होते. लाईव्ह व्हिडीओ पाठवले जातील, अशा पद्धतीने ते सीसीटीव्ही लावले गेले होते. पोलिसांनी ५ पिस्तुल आणि २४ जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत.
पाकिस्तानातील एजंटशी संपर्क
अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली गेली, त्यात पाकिस्तान असलेल्या एजंटशी त्यांचा नियमित संपर्क होता आणि नियोजनबद्ध पद्धतीने हेरगिरी केली जात होती. अटक करण्यात आलेल्या ११ जणांपैकी ८ पंजाबचे आणि ३ दिल्लीतील आहेत.
संवेदनशील आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी हे सीसीटीव्ही लावले जात होते. यातून लष्कराच्या हालचाली, लष्कराच्या प्रवासाचे रस्ते, रेल्वेच्या हालचाली, शस्त्रास्त्रांची वाहतूक आदी गोष्टी रेकॉर्ड करून व्हॉट्सअप किंवा इतर विशेष माध्यमातून पाकिस्तान बसलेल्या लोकांना थेट पाठवल्या जातील. ५० महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचा त्याचा प्लॅन होता, अशीही माहिती समोर आली आहे.