क्रिप्टो फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; देशभरात 60 ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:09 IST2025-02-25T19:09:09+5:302025-02-25T19:09:29+5:30
CBI Raid : सीबीआयने पुणे, नांदेड, कोल्हापूरसह अनेक मोठ्या शहरांमध्ये छापे टाकले.

क्रिप्टो फसवणूक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; देशभरात 60 ठिकाणी छापे
CBI Raid : गेल्या काही काळापासून क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीची प्रकरणे वाढली आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारकडून सातत्याने पाऊले उचलली जात आहेत. दरम्यान, आता CBI ने अशा क्रिप्टो फसवणूक प्रकरणांमध्ये देशभरात 60 ठिकाणी छापे टाकले. पुणे, नांदेड, कोल्हापूर, दिल्ली एनसीआर, चंदीगड, बंगळुरुसह अनेक मोठ्या शहरांमध्ये छापे टाकण्यात आले. यादरम्यान, बनावट वेबसाइट्सद्वारे फसवणूक केल्याचे उघड झाले.
कसा झाला क्रिप्टोकरन्सी घोटाळा ?
क्रिप्टोकरन्सीशी संबंधित हा घोटाळा 2015 मध्ये सुरू झाला, ज्यामध्ये अमित भारद्वाज (मृत), अजय भारद्वाज आणि त्यांच्या एजंटचा समावेश होता. या लोकांनी GainBitcoin आणि इतर अनेक नावांनी वेबसाइट तयार केल्या आणि लोकांना पॉन्झी स्कीम अंतर्गत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायला लावली होती. या सर्व वेबसाइट्स व्हेरिएबलटेक पीटीई लि. नावाच्या कंपनीद्वारे नियंत्रित केल्या जायच्या.
CBI conducting searches at 60 locations across country in connection with bitcoin and crypto fraud case: Officials
— Press Trust of India (@PTI_News) February 25, 2025
मोठा परतावा देण्याचे आश्वासन दिले होते?
क्रिप्टोकरन्सी फसवणूक करणारे अमित भारद्वाज (मृत) आणि अजय भारद्वाज यांनी गुंतवणूकदारांना या योजनेत 18 महिन्यांसाठी बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. त्या बदल्यात त्यांनी 10 टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. गुंतवणूकदारांना एक्सचेंजेसमधून बिटकॉइन खरेदी करण्यासाठी आणि "क्लाउड मायनिंग" कराराद्वारे GainBitcoin सह गुंतवणूक करण्यास देखील प्रोत्साहित केले गेले.
सुरुवातीला परतावा दिला
आरोपींनी गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी सुरुवातीला त्यांना परतावा दिला, परंतु 2017 मध्ये गुंतवणूकदारांची संख्या कमी झाल्यानंतर ही योजना फ्लॉप झाली आणि आरोपींनी गुंतवणूकदारांचे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांचे पैसे इन-हाऊस MCAP क्रिप्टोकरन्सीमध्ये बदलले, ज्याचे मूल्य वास्तविक मूल्यापेक्षा खूपच कमी होते.
देशभरात एफआयआर
या क्रिप्टोकरन्सीच्या फसवणुकीत, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप करत भारतभरात अनेक एफआयआर नोंदवण्यात आले. या घोटाळ्याचा आकार लक्षात घेता जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये नोंदवलेली प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे वर्ग केली होती. आता याप्रकरणी सीबीआयने कारवाई सुरू केली आहे.