तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:26 IST2025-11-10T15:14:34+5:302025-11-10T15:26:33+5:30
Tirupati Laddu Prasad scam: आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानामध्ये लाडू प्रसाद बनवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या ...

तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
Tirupati Laddu Prasad scam: आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानामध्ये लाडू प्रसाद बनवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या तुपात झालेल्या भेसळीच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या विशेष तपास पथकाच्या चौकशीत, उत्तराखंडमधील एका डेअरीने २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात तब्बल ६८ लाख किलोग्राम बनावट तूप टीटीडीला पुरवले असून, या त्याची किंमत २७५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचा खुलासा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या डेअरीने दूध किंवा लोण्याचा एक थेंबही खरेदी न करता हे मोठे षडयंत्र कसे रचले याची माहिती न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
केमिकल्स पुरवठादार अजय कुमार सुगंध याला अटक केल्यानंतर एसआयटीने नेल्लोर कोर्टात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या गंभीर बाबींचा खुलासा केला आहे.
या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी उत्तराखंडमधील भगवानपूर येथील भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी असून, तिचे प्रवर्तक पोमिल जैन आणि विपिन जैन आहेत. सीबीआयच्या तपासात सिद्ध झाले की, भोले बाबा डेअरीने २०१९ ते २०२४ या काळात कोठूनही दूध किंवा तुपाचा एक थेंबही खरेदी केला नाही. तरीही, त्यांनी बनावट उत्पादन करून टीटीडीला तब्बल ६८ लाख किलोग्राम भेसळयुक्त तूप पुरवले. कंपनीने एका डेअरी युनिटच्या नावाखाली संपूर्णपणे बनावट तूप उत्पादन युनिट उभारले होते आणि फसवणूक करण्यासाठी त्यांनी बनावट दूध खरेदी आणि व्यवहाराचे रेकॉर्ड्स तयार केले होते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तुपात भेसळीसाठी त्यांनी अत्यंत सोपी आणि स्वस्त पद्धत वापरली. कंपनीने पाम तेल आयात करणाऱ्या एका दिल्लीतील कंपनीकडून मोठ्या प्रमाणात पाम तेल आणि पाम कर्नल तेल विकत घेतले. या तेलाला तुपाचा रंग आणि सुगंध देण्यासाठी अटक करण्यात आलेल्या अजय कुमार सुगंध आणि दिल्लीतील ॲरिस्टो केमिकल्स सारख्या पुरवठादारांकडून मोनोडिग्लिसराइड्स, ॲसिटिक ॲसिड एस्टर, लॅक्टिक ॲसिड आणि विविध रसायने खरेदी गेली जात होती.
फेटाळलेले तूप पुन्हा पुरवले
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, एकदा तिरुपती देवस्थानमने फेटाळलेले भेसळयुक्त तूप त्यांना पुन्हा पुरवण्यात आले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याच्या कारणावरून टीटीडीने एआर डेअरीने पुरवलेले तुपाचे चार टँकर परत पाठवले होते. मात्र,सीबीआयच्या तपासात हे टँकर एआर डेअरी प्लांटमध्ये परत न जाता, तिरुपती येथील वैष्णवी डेअरी प्लांटजवळ असलेल्या एका स्थानिक स्टोन क्रशिंग युनिटकडे वळवण्यात आले. ऑगस्ट २०२४ मध्ये, याच वैष्णवी डेअरीने त्या टँकर्सचे लेबल बदलले आणि तेच तूप पुन्हा टीटीडीला पुरवले. हे भेसळयुक्त तूप नंतर पवित्र तिरुपती लाडू प्रसाद बनवण्यासाठी वापरले गेले.
टीटीडीने भोले बाबा डेअरीला २०२२ मध्ये ब्लॅकलिस्ट केले असतानाही त्यांनी वैष्णवी डेअरी, मल गंगा आणि एआर डेअरी फूड्स यांसारख्या अन्य कंपन्यांच्या माध्यमातून हे घोटाळे सुरूच ठेवले. सीबीआय आणि एसआयटी सध्या या घोटाळ्यातील सर्व कंपन्या, त्यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि टीटीडीमधील संशयास्पद अधिकाऱ्यांची कसून चौकशी करत आहे.