गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायला कार चालवायला दिली, पोरीनं थेट दोन बाइकस्वारांना उडवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 21:25 IST2022-08-04T21:23:44+5:302022-08-04T21:25:06+5:30
छत्तीसगडच्या विलासपूर शहरात एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तिला स्वत:जवळची कार चालवण्यासाठी दिली आणि भीषण दुर्घटना घडली आहे.

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायला कार चालवायला दिली, पोरीनं थेट दोन बाइकस्वारांना उडवलं!
विलासपूर-
छत्तीसगडच्या विलासपूर शहरात एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तिला स्वत:जवळची कार चालवण्यासाठी दिली आणि भीषण दुर्घटना घडली आहे. संबंधित तरुणीला कार चालवता येत नव्हती तरी तरुणानं तिला प्रोत्साहन देत नको ते धाडस केलं. पण तरुणीच्या वेडापायी दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तरुणीनं कार चालवण्याचं प्रशिक्षणही घेतलेलं नव्हतं तरी तिनं चार चालवण्यास घेतली. यात तिनं पुढे जाऊन दोन बाइकस्वारांना धडक दिली. धडक इतकी जोरदार दिली की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुण आणि त्याच्या गर्लफ्रेंडला अटक केली आहे. तसंच कारची मालकी असलेल्या तरुणाच्या वडिलांविरोधातही गुन्ह्याची नोंद केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना विलासपूर जवळच्या कोटा रोड ग्राम नेवरा परिसरात घडली. मुंगेली येथील रहिवासी रविंद्र कुर्रे त्याची गर्लफ्रेंडसोबत कारनं फिरायला निघाला होता. रविंद्रनं थोड्यावेळानं गर्लफ्रेंडला कार चालवायला दिली. तरुणीनं कारच्या एक्सिलेटरवर जोरात पाय दिला आणि समोरुन जाणाऱ्या दोन बाइकस्वारांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ५० वर्षीय शुकुवारा बाई केवट आणि जेताराम यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की बाइक काही मीटर दूर अंतरावर फेकली गेली.
दुर्घटनेत तुलसीराम यादव नावाचा व्यक्ती देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तरुणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पकडलं व पोलिसांकडे सोपवलं. कार रविंद्र कुर्रे याच्या वडिलांच्या नावावर नोंदणीकृत आहे. पोलिसांनी कारच्या मालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.