ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 06:20 IST2025-05-24T06:20:17+5:302025-05-24T06:20:17+5:30

ऑनलाईन सट्टेबाजी ॲपच्या नियमनासाठी काय उपाययोजना करताय? आयपीएलच्या आडून लोकांची ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार सुरू आहे. हे थांबले पाहिजे, परंतु, कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

can not stop online gambling law supreme court expresses desperation asks reply to central govt | ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा

ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आयपीएलच्या आडून लोकांची ऑनलाईन सट्टेबाजी, जुगार सुरू आहे. हे थांबले पाहिजे, परंतु, कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे आपण लोकांना हत्या करण्यापासून रोखू शकत नाहीत, तसाच हा प्रकार असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या मुद्द्यावर केंद्र सरकारला नोटीस बजावून न्यायालयाने म्हणणे मागवले आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या न्यायपीठाने के. ए. पॉल यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना यासंबंधीच्या कायद्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या. या याचिकेत ऑनलाईन सट्टेबाजी व जुगाराचे गंभीर परिणामही नमूद करण्यात आले आहेत. 

खंडपीठाने म्हटले की, या विषयावर केंद्र सरकार काही उपाय करीत आहे की नाही, हे आम्ही त्यांना विचारले आहे. केंद्राला नोटीस देखील बजाण्यात आली असून उत्तरासाठी अवधी देण्यात आला आहे. या प्रकरणात खंडपीठाने ॲटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरलकडून मदत मागितली असून गरज पडल्यास सर्व राज्यांकडून नंतर उत्तरे मागवली जातील, असेही स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले... : या प्रकरणात आम्ही फार काही करू शकत नाहीत कारण ही एक सामाजिक विकृती आहे. कायदे करून हे थांबवता येऊ शकत नाही. याबाबत आम्ही केंद्र सरकारला विचारणा केली आहे.

...वैधानिक इशाऱ्याचा दाखला : याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, सिगारेटच्या पाकिटांवर धुम्रपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत वैधानिक इशारा दिलेला असतो. मात्र, सट्टेबाजीच्या ॲपवर अशा प्रकारचा कोणताही इशारा दिलेला नसतो. 

अभिनेते, क्रिकेटरही करतात प्रचार

ऑनलाईन सट्टेबाजी-जुगारावर नियंत्रणाची मागणी करणाऱ्या या याचिकेत अनेक गंभीर दाखले देण्यात आले आहेत. त्यानुसार, अनेक प्रभावी लोक, अभिनेते आणि क्रिकेटपटू बिनधास्तपणे अशा ऑनलाईन ॲपचा प्रचार करीत असल्याचे याचिकेत नमूद आहे. यामुळेच मुले या सट्टेबाजीकडे आकर्षित होत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

याचिकाकर्ता स्वत: उपस्थित, काेर्टात मांडली भूमिका

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात स्वत: हजर झालेल्या याचिकाकर्त्याने आपली भावना मांडली. पॉल म्हणाले, ‘ज्यांनी आपली  मुले गमावली आहेत त्या लाखो माता-पित्यांची बाजू मी इथे मांडत आहे. एकट्या तेलंगणात आतापर्यंत १०२३ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. याला बॉलीवूड आणि टॉलीवूडचे २५ अभिनेते व प्रभावी लोक जबाबदार आहेत.’ पॉल यांनी दावा केला की, तेलंगणात या ॲपचा प्रचार करणाऱ्यांविरुद्ध  एक एफआयआर पण दाखल करण्यात आला होता. 

अनेक मुलांच्या आत्महत्या

या ऑनलाईन सट्टेबाजीमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा ॲपच्या वापरातून आलेल्या नैराश्यामुळे कित्येक मुलांनी आत्महत्या केली असल्याचे याचिकेत नमूद आहे. 

 

Web Title: can not stop online gambling law supreme court expresses desperation asks reply to central govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.