'डंकी रूट' नं अमेरिकेत जाऊनही मिळते नोकरी अन् ग्रीन कार्ड, पण कसं?; तज्ज्ञ सांगतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 09:48 IST2025-02-18T09:47:26+5:302025-02-18T09:48:15+5:30
US Illegal Immigration: अमेरिकेत डंकी रूटमार्गे येणाऱ्यांना IELTS सारख्या परीक्षा उत्तीर्ण करण्याचीही गरज नाही, ना त्यांना कुठल्या यूनिवर्सिटीत प्रवेश घ्यावा लागतो. इतकेच नाही तर अनेक गायक त्यांच्या गाण्यामध्ये डंकी रूट प्रमोट करतात

'डंकी रूट' नं अमेरिकेत जाऊनही मिळते नोकरी अन् ग्रीन कार्ड, पण कसं?; तज्ज्ञ सांगतात..
नवी दिल्ली - अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना त्यांच्या देशात सोडले जात आहे. शेकडो भारतीयांना अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलं आहे. यूएसमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या ११२ भारतीयांना घेऊन अमेरिकेचं तिसरं विमान सोमवारी अमृतसरला पोहचले. अमेरिकेत बेकायदेशीर जाण्यासाठी भारतीयांकडून डंकी रूटचा सर्वाधिक वापर केला जातो. यासाठी एजेंटला लाखो रूपये दिले जातात. त्यानंतर दक्षिण अमेरिकन देशांच्या मार्गाने मॅक्सिको बॉर्डर पार करून या लोकांना अमेरिकेत पाठवले जाते.
अमेरिकेत नोकरी करण्याचं स्वप्न बाळगून डंकी रूटने प्रवास करणे अतिशय धोकादायक मानलं जाते कारण अनेकदा रस्त्यात या लोकांना मृत्यूला सामोरं जावे लागते. डंकी रूटने अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना पनामा, निकारगुआसारख्या दक्षिणी अमेरिकन देशाच्या जंगलात जीव गमवावा लागतो. मात्र या सर्वात मोठा प्रश्न कायम राहतो तो म्हणजे, जे लोक डंकी मार्गे अमेरिकेत पोहचतात त्यांना काम करण्याची परवानगी कशी मिळते अथवा ते कसे ग्रीन कार्ड मिळवतात याचीही माहिती अनेकांना जाणून घ्यायची असते.
इमिग्रेशन कंसल्टेंट विनय कुमार यांनी सांगितले की, मागील २५ वर्षात ७.२५ लाख भारतीयांना अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला आहे. स्टडी व्हिसा घेऊन जाणाऱ्यांना ४ वर्षापर्यंत वर्षाला ८० लाख खर्च करावे लागतात अथवा त्यांना त्यांच्या क्वालिफिकेशन आधारे नोकरी मिळते. तर डंकी रूटने केवळ ५० लाख अथवा त्याहून अधिक खर्च करावा लागतो. अमेरिकेत जाण्यासाठी बहुतांश भारतीय या डंकी रूटचा वापर करतात. अनेकदा ग्रीन होल्डर्स अभिमानाने सांगतात त्यांनी किती कठीण प्रसंगाचा सामना करत डंकी रूटमार्गे अमेरिकेत आले त्यामुळेच अन्य लोकही अवैधमार्गाचा वापर करतात. अमेरिकेत डंकी रूटमार्गे येणाऱ्यांना IELTS सारख्या परीक्षा उत्तीर्ण करण्याचीही गरज नाही, ना त्यांना कुठल्या यूनिवर्सिटीत प्रवेश घ्यावा लागतो. इतकेच नाही तर अनेक गायक त्यांच्या गाण्यामध्ये डंकी रूट प्रमोट करतात जे खूप आश्चर्यकारक आहे असं त्यांनी म्हटलं.
बेकायदा स्थलांतरांना कसं मिळतं काम आणि ग्रीन कार्ड?
अवैध मार्गाने अमेरिकेत घुसखोरी केलेल्यांना काम देण्यात मोठी भूमिका वकील निभावतात. वकील अधिकचे शुल्क घेऊन अशा लोकांना अमेरिकेत आश्रय मिळवून देतात, ज्यातून त्यांना नोकरी मिळते. एकदा जो कुणी मॅक्सिको बॉर्डर पार करून अमेरिकेत पोहचतो, त्यातील काही स्वत:ला अमेरिकन पोलिसांकडे आत्मसर्मपण करतात. काही महिने ते शरणार्थी शिबिरात राहतात. या लोकांना वकील भेटतात आणि जे इमिग्रेशन दंड आहे तो भरून जामीन मिळवून देतात. त्याचा खर्च या लोकांना स्वत: उचलावा लागतो. त्यानंतर त्यांना अमेरिकेत काम करण्याचा अधिकार मिळतो आणि स्थलांतरित आश्रय मागण्यासाठी अर्ज दाखल करतात.
याआधी शिबिरात लोकांना डिपोर्ट केले जायचे, परंतु त्यातील काहींना जामीन आणि काम करण्याचा अधिकार मिळायचा त्यामुळे डिर्पोटेशनच्या भीतीशिवाय नोकरी करण्याचा मार्ग मोकळा व्हायचा. ज्या लोकांना अमेरिकेत आश्रय दिला जातो, त्यांना ग्रीन कार्डसाठीही अर्ज करण्याचा अधिकार मिळतो. काही लोक असेही असतात जे पैसे खर्च करून कुठल्याही अमेरिकन नागरिकाशी लग्न करतात ज्यामुळे त्यांना ग्रीन कार्ड मिळते. बहुतांश लग्न ग्रीन कार्डसाठीही केले जाते. बेकायदेशीर घुसखोरी केलेल्या लोकांना ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याठिकाणी आश्रय मागणे हे आहे.