रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ; शेतकऱ्यांना मोदी सरकारचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 18:59 IST2018-10-03T18:51:16+5:302018-10-03T18:59:29+5:30
गहू, मसूर, हरभऱ्याच्या आधारभूत किमतीत वाढ

रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ; शेतकऱ्यांना मोदी सरकारचा दिलासा
नवी दिल्ली: मोदी सरकारनं रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. गहू, हरभरा, मोहरी, मसूर यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे. मोदी सरकारनं गव्हाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 105 रुपयांची वाढ केली आहे. याआधी एक क्विंटल गव्हाला 1,735 रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जात होती. ती आता 1,840 रुपये करण्यात आली आहे.
हरभऱ्याची आधारभूत किंमतदेखील वाढवण्यात आली आहे. आधी हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,440 रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जात होती. आता हरभऱ्याला 4,620 रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जाईल. तर मसूर डाळीला 4,475 रुपये प्रति क्विंटल इतकी आधारभूत किंमत मिळेल. याआधी ती 4,250 रुपये इतकी होती. कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशीनंतर केंद्र सरकारनं रबी पिकांच्या आधारभूत किमती वाढवण्याचा निर्णय घेतला.
गव्हाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 105 रुपयांची वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव सीएसीपीनं केंद्र सरकारला दिला होता. हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटनं आज मंजूर केला. यासोबतच मोहरी, हरभरा, मसूर यांच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्याची शिफारसदेखील सीएसीपीनं केली होती. या सर्व शिफारशी मोदी सरकारनं मंजूर केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.