भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 06:06 IST2025-08-03T06:03:11+5:302025-08-03T06:06:02+5:30
ट्रम्प यांचे ‘मृत अर्थव्यवस्था’ वक्तव्य, टॅरिफ धमकीला पंतप्रधान मोदी यांची अप्रत्यक्ष चपराक; म्हणाले, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर

भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
वाराणसी : भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने स्वतःच्या आर्थिक हित, प्राधान्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. भारतीयांनी स्वदेशी उत्पादने वापरण्यावर अधिक भर द्यावा. भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच व्यापाऱ्यांनी दुकानात ठेवल्या पाहिजेत आणि आपण ग्राहकांनीही त्याच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी धरला. भारत हा मृत अर्थव्यवस्था असल्याचे सांगत भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क २५ टक्के करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाराणसी येथे एका कार्यक्रमात मोदी यांनी ट्रम्प यांना ही अप्रत्यक्ष चपराक लगावली.
रशियाकडून लष्करी उपकरणे आणि खनिज तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारताला दंडही आकारला आहे. या घडामोडींबाबत पंतप्रधान मोदी कुणाचाही नामोल्लेख न करता म्हणाले की, जगातील अर्थव्यवस्था सध्या अस्थिर असून, अशा काळात अनेक देश फक्त आपल्या हितसंबंधांकडे लक्ष देत आहेत. भारतालाही आपल्या आर्थिक हिताबाबत सजग राहावे लागणार आहे. स्वदेशीचा कठोर पुरस्कार आणि सामूहिक प्रयत्नांतूनच आपण भारताला विकसित देश बनवू शकतो.
जगाने पाहिले भारताचे रौद्र स्वरूप
ऑपरेशन सिंदूरमुळे जगाला भारताची ताकद, त्याचे रौद्र रूप दिसले. आमच्या देशावर हल्ला करणारे पाताळात जरी दडून बसले, तरी त्यांना सोडणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी वाराणसीतील एका जाहीर सभेत म्हटले. त्यांनी सांगितले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांची हत्या झाली. या घटनेने मी व्यथित झालो. आपल्या देशातील मायभगिनींच्या ‘सिंदूर’वर ज्यांनी हल्ला केला त्यांचा बदला घेण्याचे वचन मी महादेवाच्या कृपेने पूर्ण केले.
ऑपरेशन सिंदूरचे यश मी महादेवांच्या चरणी अर्पण करत आहे. १४० कोटी भारतीयांनी दाखविलेली एकजूट हेच या मोहिमेमागील खरे सामर्थ्य आहे. शिव म्हणजे कल्याण, पण जेव्हा वाईट गोष्टी, दहशतवाद डोके वर काढतो, तेव्हा महादेव रौद्र रूप धारण करतात. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताचे हेच रूप जगाने पाहिले.
समाजवादी पक्षाची संमती घ्यायची का ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पहलगाममधील हल्लेखोरांचा आताच का खात्मा केला, असा प्रश्न समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने संसदेत विचारला. दहशतवाद्यांवर हल्ला आता करायचा की नंतर, असे मी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना फोन करून विचारावे, अशी त्यांची अपेक्षा आहे का? असा सवाल मोदी यांनी केला.
स्वदेशी वस्तूच विकायचा निर्धार व्यापाऱ्यांनी करावा -
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायचे असेल तर देशातील प्रत्येक पक्ष, नेता, नागरिकाने स्वदेशी वस्तूंचा वापर आणि प्रचार
केला पाहिजे. आपल्या दुकानांमध्ये फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जातील, याकडे भारतातील व्यापारी, दुकानदारांनी लक्ष दिले पाहिजे. तिच देशाची खरी सेवा ठरणार आहे. स्वदेशी गोष्टींविषयीचा आग्रह आपल्या प्रत्येक कृतीतून दिसला पाहिजे.