Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:13 IST2025-11-02T10:12:19+5:302025-11-02T10:13:05+5:30
BJP Manoj Tiwari : बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील डुमराव येथे भाजपा खासदार आणि उमेदवार मनोज तिवारी यांच्या रोड शो दरम्यान मोठा गोंधळ झाला.

Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील डुमराव येथे भाजपा खासदार आणि उमेदवार मनोज तिवारी यांच्या रोड शो दरम्यान मोठा गोंधळ झाला. रोड शो दरम्यान आरजेडी समर्थकांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला केला, शिवीगाळ केली आणि लाठ्या-काठ्यांनी वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप तिवारी यांनी केला. हा लोकशाहीवर हल्ला आहे आणि निवडणूक आयोगाने त्वरित कठोर कारवाई करावी असंही म्हटलं.
माध्यमांशी बोलताना मनोज तिवारी म्हणाले, "आम्ही डुमरावमध्ये रोड शो आयोजित केला होता. सुरुवातीला काही लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि नंतर आमच्या वाहनावर आरजेडीचा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही विरोध केला तेव्हा त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या वाहनांना वेढा घातला."
"वाहनांवर लाठ्यांनी हल्ला, खिडक्या फोडण्याचा प्रयत्न"
"परिस्थिती इतकी बिकट झाली की, चालकांना वेगाने गाडी चालवावी लागली. मोकामासारख्या परिस्थितीची आम्हाला काळजी वाटत होती, म्हणून आम्ही त्यांना ताबडतोब निघून जाण्याचे आदेश दिले, परंतु त्यांनी आमच्या वाहनांवर लाठ्यांनी हल्ला केला आणि खिडक्या फोडण्याचा प्रयत्न केला."
"आरजेडीकडून भीती पसरवण्याचा प्रयत्न"
भाजपा खासदाराने पुढे म्हटलं की, हा एक गुन्हा आहे आणि निवडणुकीदरम्यान असं वर्तन अस्वीकार्य आहे. त्यांनी सांगितलं की ते या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षकांशी (एसपी) बोलले आहेत आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तिवारी यांनी आरोप केला की, आरजेडी लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी निवडणुकीत हिंसाचाराचं वातावरण निर्माण करत आहे.
मनोज तिवारी म्हणाले की, जर अशा घटनांवर कठोर कारवाई केली गेली नाही तर बिहारमध्ये निष्पक्ष निवडणुका घेणे कठीण होईल. त्यांनी प्रशासन आणि निवडणूक आयोगाने व्हिडीओ फुटेज आणि स्थानिक साक्षीदारांच्या आधारे दोषींची ओळख पटवून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली.