बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 06:07 IST2025-09-12T06:06:44+5:302025-09-12T06:07:30+5:30
सरकारने याआधी खासगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन) फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला आहे.

बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक मंत्रालय राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बस ऑपरेटर्सना टोलमध्ये सवलत देण्यासाठी नवे धोरण आणण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.
सरकारने याआधी खासगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन) फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू केला आहे. हा पास १५ ऑगस्टपासून लागू झाला असून त्याची किंमत ३,००० रुपये आहे. पास घेतल्यावर तो एक वर्ष किंवा जास्तीत जास्त २०० फेऱ्या यापैकी जे आधी संपेल, तेव्हापर्यंत तो वैध राहतो.
हायड्रोजन ट्रकसाठी पायलट प्रकल्प
गडकरी म्हणाले की, देशभरातील १० महामार्गावर हरित हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकची चाचणी सुरू होणार आहे. या मार्गावर हायड्रोजन भरण्याची केंद्रे (फ्युअल स्टेशन) इंडियन ऑइल आणि रिलायन्स पेट्रोलियम उभारणार आहेत.
हरित हायड्रोजनवर ट्रक कुठे चालणार?
ग्रेटर नोएडा-दिल्ली-आग्रा
भुवनेश्वर - पुरी - कोणार्क
अहमदाबाद - वडोदरा - सूरत
साहिबाबाद - फरिदाबाद - दिल्ली
जमशेदपूर - कलिंगनगर तिरुवअनंतपुरम - कोची
जामनगर - अहमदाबाद
सरकार बांधणार ७५० विश्रांती केंद्रे
टाटा मोटर्स, अशोक लेलँड आणि व्होल्वो यांनी हायड्रोजनवर चालणारे ट्रक तयार करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सध्या महामार्गालगत खासगी जमिनीवर ७५० विश्रांती केंद्रे उभारत आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.