“मोबाईलमध्ये असे मेसेज आहेत की ते डिलीट केले नाही तर अडकेन”; भाजपा खासदाराचं संसदेत विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:11 IST2021-03-17T15:10:00+5:302021-03-17T15:11:24+5:30
Cyber Fraud Issue Raised in Rajyasabha: त्याचसोबत बँकेकडून परवानगी नसतानाही गुन्हेगार क्रेडिट मर्यादेपलीकडे रोख रक्कम काढण्यास यशस्वी होतात

“मोबाईलमध्ये असे मेसेज आहेत की ते डिलीट केले नाही तर अडकेन”; भाजपा खासदाराचं संसदेत विधान
नवी दिल्ली – राज्यसभेत बुधवारी काही सदस्यांनी डिजिटल व्यवहार, एटीएमच्या ग्राहकांसोबत होणाऱ्या फसवणुकीबाबत आणि बँकिंग सुविधेवर मुद्दा उचलला आणि, सरकारने आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपा खासदार शिवप्रताप शुक्ला यांनी सायबर गुन्हेगारांकडून बँक ग्राहकांना फोन करून फसवणूक केल्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केला होता. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याचा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणलं.
याबाबत उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार शिवप्रताप शुक्ला म्हणाले की, फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना फोन करून त्यांची फसवणूक केली जाते, त्यासाठी हे गुन्हेगार बनावट डोमेनचा वापर करतात. हे सायबर गुन्हेगार कॉल करून KYC अपडेट करण्याचं ग्राहकांना सांगतात. असं नाही केल्यास खाते बंद होण्याची धमकी देतात. त्यामुळे समोरील ग्राहक घाबरून OTP देतो. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यावरून परस्पर मोठी रक्कम लंपास करण्याचे प्रकार घडतात.
त्याचसोबत बँकेकडून परवानगी नसतानाही गुन्हेगार क्रेडिट मर्यादेपलीकडे रोख रक्कम काढण्यास यशस्वी होतात. मला या प्रकराचे अनेक घटना समजल्या आहेत. जिथे मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली गेली आहे. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. आताही मोबाईलवर असे मेसेज आहेत, जे डिलीट केले नाही तर अडकेन असं भाजपा खासदार म्हणाले. यावर सभापती वैकय्या नायडूंनी सांगितलं की, ५ लाखांची लॉटरी लागली आहे असे मेसेज सगळ्यांना येत आहेत, ५ रुपये दिले तर ५ लाखांची लॉटरी लागेल असं ते म्हणाले.
लोकांना त्यांचे पैसे परत मिळावेत
भाजपा खासदार संसदेत म्हणाले की, बँक कोणतीही कारवाई करत नाही, अशा प्रकरणात तातडीने कारवाई होऊन जे पीडित असतील त्यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत. ग्राहकांच्या मोबाईलवर अशाप्रकारे मेसेज येतात की, काही रुपये जमा करा तुम्हाला लाखो रुपये मिळतील, प्रलोभन दाखवून ग्राहकांची लूट होते असं त्यांनी सांगितले.
पिन ऐवजी ओटीपी लागू करा
भाजपाचे रामकुमार वर्मा यांनी एटीएममधून पैसे काढण्याबाबत सरकारला पिन ऐवजी ओटीपी लागू करण्याची मागणी केली, त्यामुळे एटीएममधून परस्पर पैसे काढण्याचं सायबर गुन्ह्यांना आळा घालता येईल असं त्यांनी सांगितले.