"बसपा कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य...", मायावतींनी ठामपणे सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:55 IST2024-12-07T17:53:35+5:302024-12-07T17:55:24+5:30
बसपा सुप्रिमो मायावती म्हणाल्या की, कोण कोणत्या पक्षाच्या लोकांशी नातेसंबंध जोडत आहे, याच्याशी पार्टीचा काहीही संबंध नाही.

"बसपा कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य...", मायावतींनी ठामपणे सांगितलं
अलीकडेच बहुजन समाज पार्टीच्या (BSP) एका नेत्यानं आपल्या मुलाचं लग्न समाजवादी पार्टीच्या (SP) आमदाराच्या मुलीशी केल्यामुळं पार्टीतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी शनिवारी या वृत्ताचं खंडन केलं आहे. त्या म्हणाल्या की, बसपाच्या कार्यकर्त्यांना कोणाशीही लग्न करण्यास स्वातंत्र्य आहे.
बसपा रामपूरचे माजी अध्यक्ष सुरेंद्र सागर यांच्या मुलाने नुकतेच आंबेडकरनगर जिल्ह्यातील आलापूर येथील समाजवादी पार्टीचे आमदार त्रिभुवन दत्त यांच्या मुलीशी लग्न केले आहे. यापूर्वी त्रिभुवन दत्त हे बसपामध्ये होते, परंतु 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला.
बसपा सुप्रिमो मायावती म्हणाल्या की, कोण कोणत्या पक्षाच्या लोकांशी नातेसंबंध जोडत आहे, याच्याशी पार्टीचा काहीही संबंध नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे मायावती यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, सुरेंद्र सागर आणि रामपूरमधील बसपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रमोद कुमार यांची त्यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याचा लग्नाशी काहीही संबंध नाही.
सुरेंद्र सागर आणि प्रमोद कुमार यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता, त्यामुळे पार्टीच्या कामावर परिणाम होत होता. त्यांच्या वादाचा पार्टीच्या कामावर परिणाम होऊ नये, यासाठी या दोघांची एकत्र पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली. कोण कोणत्या पार्टीच्या लोकांशी नातेसंबंध जोडतो, त्याचा पार्टीशी काहीही संबंध नाही. लोक त्यांना हवे तिथे नाते जोडू शकतात. हे सर्व त्यांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे, परंतु याविषयी खोटा प्रचार करणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असेही मायावती म्हणाल्या.