“प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:17 IST2024-12-24T14:17:06+5:302024-12-24T14:17:11+5:30
Akash Anand News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत पश्चाताप करावाच लागेल, अशी टीका करण्यात आली आहे.

“प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका?
Akash Anand News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे संसदेसह देशात पडसाद उमटले. इंडिया आघाडीने या मुद्दा लावून धरत संसदेत घोषणाबाजी करत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. संसदेचे कामकाज वारंवार स्थगित करण्यात आले. संसदेबाहेरही काँग्रेसने अमित शाह आणि भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. यातच मायावती यांचे भाचे आकाश आनंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शाह यांनी केलेले विधान आणि काँग्रेसचे आक्रमक पवित्रा या दोन्हींवर टीका केली आहे.
अमित शाह यांच्या विधानाचा निषेध म्हणून काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निळे टी-शर्ट परिधान करून संसदेबाहेर घोषणाबाजी केली होती. तर महाराष्ट्रातील परभणी दौऱ्यावर येतानाही राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. काँग्रेस आणि इंडिया आघाडीने केलेल्या टीकेचा भाजपाकडून खरपूस शब्दांत समाचार घेतला जात असतानाच, बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांचे भाचे आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय
एक्सवर एक पोस्ट शेअर करत आकाश आनंद यांनी आपली रोखठोक भूमिका मांडत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोट्यवधी शोषित, वंचित आणि गरिबांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर देवच आहेत. मात्र, मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर करणे आजकाल फॅशन झाली आहे. आधी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत त्यांचा अपमान केला आणि त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आमच्या क्रांतीला फॅशन शो करून टाकले तसेच यानंतर अरविंद केजरीवाल यांनी बाबासाहेबांची प्रतिमा डागाळली. देशातील दलित, शोषित, वंचित, उपेक्षितांच्या आत्मसन्मानासाठी बसपाचे मिशन सुरू राहील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत पश्चाताप करावाच लागेल, अशी पोस्ट आकाश आनंद यांनी केली आहे. तसेच या पोस्टला बाबासाहेब आमचे देव आहेत, असा हॅशटॅगही दिला आहे.
करोड़ों शोषितों, वंचितों और गरीबों के लिए बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर जी भगवान ही हैं।
— Akash Anand (@AnandAkash_BSP) December 24, 2024
लेकिन वोटों के लिए उनके नाम का इस्तेमाल करना आज कल एक फैशन हो गया है।
पहले देश के गृह मंत्री श्री अमित शाह जी ने संसद में उनका अपमान किया, फिर श्री राहुल गांधी जी व प्रियंका गांधी जी ने…
दरम्यान, अमित शाह यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांबाबत एनडीएच्या केंद्र सरकारचे समर्थक असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे पत्र दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना लिहिले. अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व राजकारण संन्यास घ्यावा, अशी मागणी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही शाह यांच्यावर टीका केली.