मायावती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, बसपाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 14:10 IST2022-01-11T14:09:19+5:302022-01-11T14:10:23+5:30
BSP Chief Mayawati : बसपा सुप्रीमो मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मायावती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, बसपाची घोषणा
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पार्टीने (बसपा) मोठी घोषणा केली आहे. बसपा सुप्रीमो मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मायावती यांच्याशिवाय बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा हे देखील निवडणूक लढवणार नाहीत.
बसपा सुप्रीमो मायावती निवडणूक लढणार नाहीत. मी देखील उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. तसेच, माझी पत्नी कल्पना मिश्रा आणि माझा मुलगा कपिल मिश्राही निवडणूक लढवणार नाहीत. मायावती यांचा भाचा आकाश आनंदही निवडणूक लढवणार नाही, असे बसपाचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी सांगितले.
याचबरोबर, सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशात बसपाचे सरकार स्थापन होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी भाजपा आणि समाजवादी पक्षात लढत आहे. निवडणुकीपूर्वी किंवा नंतर बसपाची कोणाशीही युती होणार नाही.
ते पुढे म्हणाले की, यूपीचे ब्राह्मण आमच्यासोबत आहेत. ब्राह्मण भाजपासोबत जाऊ शकत नाही आणि ब्राह्मण समाजवादी पक्षात कधीच नव्हता. त्यांचे वास्तव त्यांना माहीत आहे. भाजपा सरकारमध्ये ब्राह्मण समाजातील 500 हून अधिक लोकांची हत्या झाली. 100 हून अधिक एन्काउंटर झाले. बसपाने त्यांचा सन्मान कसा वाढवला हे ब्राह्मण समाजाने आधीच पाहिले आहे.
प्रत्येक ठिकाणी अधिकार देण्याचा विषय असो, 15 एमएलसी बनवण्याचा विषय असो, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देऊन अध्यक्ष बनवण्याचा विषय असो आणि उत्तर प्रदेशात 4 हजारांहून अधिक सरकारी वकील बनवण्याचा विषय असो सर्वच ठिकाणा ब्राह्मणांना सन्मान देण्यात आला आहे, असे सतीश चंद्र मिश्रा म्हणाले.