सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात; भरूचमधील लढत गुजरात निवडणुकीत ठरतेय लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:10 IST2022-11-26T13:10:31+5:302022-11-26T13:10:38+5:30
अंकलेश्वर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. राजकीयदृष्ट्या भाजपचा हा गढ मानला जातो.

सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात; भरूचमधील लढत गुजरात निवडणुकीत ठरतेय लक्षवेधी
रमाकांत पाटील -
भरूच : गुजरात विधानसभा निवडणुकीत भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर-हासोट विधानसभेची निवडणूक सध्या सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मोठा भाऊ जिंकणार की लहान, याबाबतची चर्चा रंगली आहे.
अंकलेश्वर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. राजकीयदृष्ट्या भाजपचा हा गढ मानला जातो. या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार ईश्वरसिंग पटेल हे सलग चार वेळा भाजपकडून विजयी झाले आहे. आता ते पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांनी गुजरात सरकारमध्ये चार वेळा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी काँग्रेसने त्यांचे सख्खे मोठे बंधू विजयसिंग पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही भावांची ही लढत गुजरातच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेची ठरली आहे.
मतदार संभ्रमात -
- कुडाद्रा गावात मात्र नागरिकांचा संबंध दोन्ही भावांशी येत
असल्याने आणि गावात बहुतांश नातेसंबंधाचे लोक राहात असल्याने मतदारांमध्ये कुणाला मतदान करावे, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
- गावात फारसे राजकीय चुरशीचे वातावरण नाही. दोन्ही भावांमध्ये आरोप-प्रत्यारोपही नाही, दोन्ही उमेदवारांशी चर्चा केल्यावर ते एकमेकांवर कुठलीही टीकाटिप्पणी करीत नाही.