गर्लफ्रेंड पुण्याला जाऊ नये म्हणून विमानात बॉम्ब असल्याची अफवा, ब्रिटीश एअरवेजचा ट्रेनी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 20:17 IST2023-01-13T20:17:20+5:302023-01-13T20:17:36+5:30
दिल्ली-पुणे स्पाईसजेट विमानात बॉम्बची खोटी माहिती देणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या प्रशिक्षणार्थीला अटक करण्यात आली आहे.

गर्लफ्रेंड पुण्याला जाऊ नये म्हणून विमानात बॉम्ब असल्याची अफवा, ब्रिटीश एअरवेजचा ट्रेनी अटकेत
दिल्ली-पुणे स्पाईसजेट विमानात बॉम्बची खोटी माहिती देणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या प्रशिक्षणार्थीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आरोपीची चौकशी करत आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. गुरुवारी आरोपींनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्पाइसजेटच्या कॉल सेंटरला फोन करून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली होती.
विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा यंत्रणांनी अनेक तास शोध मोहीम राबवली. पण फ्लाइटच्या आत काहीच सापडलं नाही. यानंतर दिल्ली पोलिसांनी बनावट कॉल करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम तयार केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं आपल्या मित्राला मदत करण्यासाठी फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली.
बॉम्बची अफवा पसरवणाऱ्या आरोपी मित्रांच्या मैत्रिणीला प्रत्यक्षात पुण्याला जायचं होतं, असेही या माहितीत उघड झालं आहे. पण त्याच्या मित्रांना त्यांच्या मैत्रिणींसोबत आणखी काही वेळ घालवायचा होता. यामुळे आरोपींनी मित्रांसोबत प्लॅन बनवला आणि स्पाइसजेटच्या कॉल सेंटरला फोन करून फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली.
विमान उड्डाण घेणार, तेव्हाच बॉम्ब असल्याची माहिती
गुरुवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली, जेव्हा फ्लाइट टेक ऑफ करणार होतं. बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून शोध मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, चौकशीत काहीही संशयास्पद आढळलं नाही.
मॉस्को-गोवा फ्लाइटमध्येही बॉम्ब असल्याची अफवा
यापूर्वी सोमवारीही अशीच एक घटना समोर आली होती. मॉस्को-गोवा विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे गुजरातमधील जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. मात्र, विमानाची झडती घेतली असता त्यात काहीही संशयास्पद आढळलं नव्हतं.