उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या या तरुणाने लग्नाआधी मुलीचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. एवढंच नाही तर त्याने तिला मंडपातून उचलून घेऊन जाण्याची धमकीही दिली. घाबरलेल्या मुलीच्या कुटुंबाने पोलिसांची मदत मागितली. लग्नासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
कौशांबीच्या पश्चिम शरीरा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाने एका मुलीचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तरुणाने मुलीच्या सासरच्या लोकांनाही अनेक वाईट गोष्टी सांगितल्या. तसेच त्याने मुलीला मंडपातून पळवून नेण्याची धमकीही दिली. यामुळे मुलीचं कुटुंब खूप जास्त घाबरलं.
वडिलांना एसपी ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांची मदत घ्यावी लागली. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला. लग्नाचे सर्व विधी पोलिसांच्या देखरेखीखाली पार पडले आणि त्यानंतर मुलीची पाठवणी करण्यात आली. मंडपातही कडक पोलीस बंदोबस्त होता. मुलीचं लग्न झाल्यानंतर वडिलांनी आणि कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.
या प्रकरणात सीओ अभिषेक सिंह म्हणाले की, पश्चिम शरीरा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात राहणाऱ्या कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. असं सांगितलं जात होतं की, गावातील एक तरुण त्यांच्या मुलीच्या लग्नात अडचणी निर्माण करत होता आणि तिच्या सासरच्यांना तिच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगत होता. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. कोणत्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून लग्नाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लग्न सुरक्षितपणे पार पडलं. आता पुढील कारवाई केली जात आहे.