मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 21:13 IST2025-11-16T21:13:19+5:302025-11-16T21:13:52+5:30
Delhi Bomb Blast Case: सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, टीआरएफ ही कुख्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाची एक 'फ्रंट ऑर्गनायझेशन' म्हणून काम करते.

मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासात अत्यंत महत्त्वाचे आणि धक्कादायक वळण आले आहे. टीआरएफ (द रेझिस्टंट फोर्स) या दहशतवादी संघटनेने अधिकृतपणे या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, टीआरएफ ही कुख्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाची एक 'फ्रंट ऑर्गनायझेशन' म्हणून काम करते. यामुळे दिल्लीतील स्फोट थेट काश्मीर-आधारित दहशतवादी कारवायांशी जोडला गेला आहे.
टीआरएफने स्फोटाची जबाबदारी स्वीकारताना हा हल्ला काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे संकेत दिले आहेत. यातून टीआरएफने आपल्या कारवाया केवळ काश्मीरपुरत्या मर्यादित नसून, देशाच्या मुख्य भूभागापर्यंत घुसण्याचा कट रचला आहे.
एका बाजूला तपास यंत्रणा स्फोटातील 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूल आणि अल फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या नेटवर्कचा तपास करत असतानाच, आता टीआरएफच्या या दाव्यामुळे संपूर्ण कट आणि त्याचा विस्तार अधिक व्यापक झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्था आता या दाव्याची सत्यता पडताळून पाहत असून, 'व्हाईट-कॉलर' नेटवर्कचा टीआरएफ/लश्करशी थेट संबंध आहे का, याचा कसून तपास सुरू आहे. टीआरएफच्या दाव्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे, कारण हा गट काश्मीरमध्येही सक्रिय असून आता त्याने थेट दिल्ली, हरियाणा, राजस्थान या भागात उपस्थिती लावल्याने मोठे आव्हान उभे केले आहे. झी न्यूजने याचे वृत्त दिले आहे.