...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 18:37 IST2025-10-19T18:36:33+5:302025-10-19T18:37:04+5:30
प्रज्ञा ठाकूर यांचे विधान ऐकून उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही लोकांनी टाळ्या वाजवल्या तर काही त्यांचे भाषण ऐकून हैराण झाले

...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
भोपाळ - जर एखाद्या मुलीने तिच्या मर्जीने परधर्मातील मुलासोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तिच्या आई वडिलांनी तिचे तंगडे तोडले पाहिजे असा अजब सल्ला भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी पालकांना दिला आहे. प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, जर आपली मुलगी बोलण्याने ऐकत नसेल, संस्काराने तिला समजत नसेल तर तिच्याशी कठोर वागले पाहिजे. मुलं कधीही वाईट वागत असतील तर आई वडील त्यांना मारतात. ही मारहाण त्यांच्या भविष्यासाठी असते. घरात मुलगी जन्मते, तेव्हा आपल्या घरी लक्ष्मी आली, सरस्वती आली म्हणून आई वडील खुश होतात. सर्वजण अभिनंदन करतात. परंतु जेव्हा ती मोठी होते, लग्नाचे वय होते ती तिच्या मर्जीने दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिचे तंगडे तोडा असं त्यांनी सांगितले.
प्रज्ञा ठाकूर यांचे विधान ऐकून उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही लोकांनी टाळ्या वाजवल्या तर काही त्यांचे भाषण ऐकून हैराण झाले. प्रज्ञा ठाकूर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधी पक्षाने आणि महिला संघटनांनी हे विधान महिला स्वातंत्र्य आणि कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याचा आरोप केला. या वादग्रस्त विधानावर भाजपाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.
प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या?
आपण आपल्या मनाला इतकं मजबूत बनवले पाहिजे की जर आपल्या मुलीला सांगूनही पटले नाही आणि तिने दुसऱ्या धर्मातील मुलासोबत लग्न केले तर तिचे तंगडे तोडायलाही मागे हटायचे नाही. जे आपले संस्कार पाळत नाहीत, आई वडिलांचे ऐकत नाही त्यांना शिक्षा मिळायला हवी. मुलांच्या भविष्यासाठी त्यांना मारायलाही लागले तरी मागे हटायचे नाही. जेव्हा आई वडील असं करतात ते मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी असते. मोठ्यांचा आदर करत नाहीत, घरातून पळायला तयार असतात त्या मुलींसोबत हे करायला हवे. त्यांना घरातून बाहेर जाऊन देऊ नका. मारा, समजून सांगा, शांत करा, प्रेमाने बोला पण त्यांना रोखा असं प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं.