Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:40 IST2025-11-07T12:40:07+5:302025-11-07T12:40:53+5:30
Larissa Nery And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका महिलेचा फोटो दाखवला आणि दावा केला की, ती ब्राझिलियन मॉडेल आहे आणि हरियाणाच्या मतदार यादीत सीमा, स्वीटी आणि सरस्वती या नावाने "२२ वेळा" मत दिलं आहे.

फोटो - ndtv.in
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका महिलेचा फोटो दाखवला आणि दावा केला की, ती ब्राझिलियन मॉडेल आहे आणि हरियाणाच्या मतदार यादीत सीमा, स्वीटी आणि सरस्वती या नावाने "२२ वेळा" मत दिलं आहे. आता ही महिला समोर आली असून तिचं खरं नाव लारिसा नेरी असं आहे. एनडीटीव्हीशी बोलताना लारिसा नेरी म्हणाली की, ती मॉडेल नाही आणि राजकारणाशी तिचा काहीही संबंध नाही. जेव्हा तिचा फोटो मोठ्या वादाचे केंद्र बनला तेव्हा तिला भीती वाटल्याचंही सांगितलं.
लारिसा नेरी एका सलूनमध्ये हेअरड्रेसर आहे. ती म्हणाली, "मी कोणालाही ओळखत नाही. मी राहुल गांधींना ओळखत नाही, त्यांच्याबद्दल कधीही ऐकलेलं नाही. मी कोणत्याही राजकीय कार्यक्रमात भाग घेत नाही. मी कधीही भारतात गेले नाही. खरंतर, मी कधीही ब्राझील सोडलेलं नाही. मीडिया कर्मचारी आणि सामान्य नागरिक वगळता कोणताही अधिकारी आतापर्यंत तिच्याशी बोललेला नाही. "
"जर माझ्या कामाचं किंवा मॅथियास (फोटो काढणारा मित्र) च्या कामाचा प्रचार करणारं काही चांगलं असतं तर मला खूप आनंद झाला असता. पण तो फोटो चुकीच्या उद्देशाने वापरला गेला. माझा फोटो अशा प्रकारच्या गोष्टीशी जोडला गेला हे समजल्यावर खूप वाईट वाटलं. छळ हा योग्य शब्द आहे की नाही हे मला माहित नाही. मला तसं वाटत नाही, पण तो एक हल्ला असल्यासारखं वाटलं."
लारिसाने स्पष्ट केलं की तिचा व्हायरल झालेला फोटो सुमारे आठ वर्षांपूर्वी, जेव्हा ती २० वर्षांची होती, तेव्हाचा होता. तिने सांगितलं की तिचा हा फोटो तिचा फोटोग्राफर मित्र मॅथियासने काढला होता. "मी हा फोटो माझ्या एका मित्रासाठी काढला जो त्यावेळी फोटोग्राफर होता. मी त्याला मदत करण्यासाठी हा फोटो काढला. तो माझ्या घराजवळच काढला होता. मी कधीही मॉडेल नव्हते. खरंतर, मी एक हेअरड्रेसर आहे आणि मी अनेक वर्षांपासून ते करत आहे. मी फक्त एक सामान्य व्यक्ती आहे जी आता या वेडेपणात अडकली" असं लारिसाने म्हटलं आहे.