ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:51 IST2025-12-30T10:51:15+5:302025-12-30T10:51:33+5:30
BrahMos Project CEO row: आपली ज्येष्ठता आणि अनुभव डावलून डॉ. जोशी यांची वर्णी लावण्यात आली असल्याचा आरोप डॉ. नायडू यांनी २०२४ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत केला होता.

ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा 'ब्रह्मोस एरोस्पेस' प्रकल्पाच्या नेतृत्वावरून मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या हैदराबाद खंडपीठाने विद्यमान डायरेक्टर जनरल आणि CEO डॉ. जयतीर्थ आर. जोशी यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे संरक्षण मंत्रालय आणि DRDO मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिवसुब्रमण्यम नंबी नायडू यांच्या दाव्यावर ४ आठवड्यांच्या आत फेरविचार करावा, असे संरक्षण मंत्रालयाला कठोर निर्देशही दिले आहेत. तसेच नवीन निर्णय होईपर्यंत ब्रह्मोसचा कारभार पाहण्यासाठी अंतरिम व्यवस्था करावी असे म्हटले आहे. या अंतरिम व्यवस्थेत डॉ. जोशी यांना पुन्हा प्रभारी म्हणून नियुक्त करू नये, असेही स्पष्ट बजावण्यात आले आहे.
आपली ज्येष्ठता आणि अनुभव डावलून डॉ. जोशी यांची वर्णी लावण्यात आली असल्याचा आरोप डॉ. नायडू यांनी २०२४ मध्ये दाखल केलेल्या याचिकेत केला होता. 'कॅट'ने या आरोपांची गंभीर दखल घेतली होती. सुनावणीवेळी डीआरडीओने निवड प्रक्रियेतील नियमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून पात्र वैज्ञानिकांना डावलले गेल्याचे कॅटने म्हटले. तसेच जोशी यांना केवळ एक वर्षाचा अनुभव होता, मग त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या व्यक्तीला कोणत्या अधिकारात डावलले असा सवालही कॅटने उपस्थित केला होता. डीआरडीओ अध्यक्षांना कोणता अधिकारी निवडावा हे अधिकार असले तरीही अशाप्रकारे सेवाज्येष्ठता डावलून नियुक्ती करणे चुकीचे असल्याचे मत कॅटने नोंदविले आहे.