भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 08:35 IST2025-09-30T08:32:05+5:302025-09-30T08:35:01+5:30
बीटीसी निवडणुकीला आगामी २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात होती.

भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
आसाममध्ये BTC म्हणजे बोडोलँड प्रादेशिक परिषदेच्या निवडणुकीचा निकाल भारतीय जनता पार्टीसाठी चिंता वाढवणारा ठरला आहे. या निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष असलेल्या बोडोलँड पीपुल्स फ्रंटने निम्म्याहून अधिक जागा जिंकून भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. मात्र या विजयाकडे भाजपा एनडीएचा विजय म्हणून पाहत आहे. परंतु गेल्या १ दशकापासून भाजपाची सुरू असलेली विजयी घोडदौड निकालात थांबल्याचे दिसून आले आहे. पहिल्यांदाच त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे.
ही निवडणूक इतकी महत्त्वाची का?
बीटीसी निवडणुकीला आगामी २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात होती. त्याशिवाय स्वत: मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा या निवडणुकीत आक्रमक प्रचार करताना पाहायला मिळाले. निवडणुकीआधी मुख्यमंत्री बिस्वा यांनी बीपीएफसोबत आघाडीचा पर्याय खुला ठेवला होता. मात्र बीपीएफने स्वतंत्र लढत भाजपाविरोधी मुद्द्यांवर निवडणूक लढली. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री बिस्वा यांनी हाग्रामा मोहिलरी आणि बीपीएफ यांचे अभिनंदन केले. बीपीएफ हा एनडीएचा घटक पक्ष आहे, त्यामुळे या सर्व ४० जागा एनडीएकडे आहेत. हाग्रामा मोहिलरी मला सकाळी भेटायला आले होते. ते एनडीएसोबतच राहतील. आमच्या युतीत कुठेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्रित काम करत राहू असं त्यांनी सांगितले.
२०१६ पासून आतापर्यंत विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला भरभरून यश मिळाले होते. परंतु यंदाच्या बीटीसी निवडणुकीत भाजपाच्या विजयाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. हाग्रामा मोहिलरी यांच्या नेतृत्वात बीपीएफने ४० पैकी २८ जागा जिंकल्या, यूपीपीएल म्हणजे यूनाइटेड पीपुल्स पार्टी लिबरल यांना ७ जागा तर भाजपाला ५ जागांवर यश आले. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत UPPL १२ आणि भाजपाला ९ जागांवर यश मिळाले होते. बीपीएफने २०२० च्या निवडणुकीत १७ जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. परंतु यूपीपीएलने भाजपा आणि गण सुरक्षा पार्टी यांच्यासोबत मिळून परिषद स्थापन केली होती.
कोण आहे हाग्रामा मोहिलरी?
बीपीएफचे प्रमुख मोहिलरी हे बंडखोर नेते आहेत. त्यांनी बोडोलँड लिबरेशन टायगर समुहाचे नेतृत्व केले होते. २००३ साली बोडो करारानंतर बीटीसीची स्थापना झाली, त्यावेळी मोहिलरी यांनी राजकारणात एन्ट्री केली. २००३ मध्ये शस्त्रे सोडून त्यांनी २००५ मध्ये बीपीएफची स्थापना केली. २०१० आणि २०१६ विधानसभा निवडणुकीत बीपीएफने चांगली कामगिरी केली. २०२० मध्ये नेत्यांनी पक्ष सोडून भाजपा आणि यूपीपीएलमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना सत्ता गमवावी लागली होती.