मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:19 IST2025-10-24T16:19:06+5:302025-10-24T16:19:30+5:30
Rajasthan News: एकाच वेळी ठरावीक अंतराने जन्माला आलेल्या नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद झाल्याची घटना राजस्थानमधील उदयपूर येथे घडली. दरम्यान, बरीच तपासणी आणि ओळख पटवल्यानंतर मातांकडे त्यांची नवजात अर्भकं सोपवण्यात आली.

मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
एकाच वेळी ठरावीक अंतराने जन्माला आलेल्या नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद झाल्याची घटना राजस्थानमधील उदयपूर येथे घडली. दरम्यान, बरीच तपासणी आणि ओळख पटवल्यानंतर मातांकडे त्यांची नवजात अर्भकं सोपवण्यात आली. सुमारे अर्ध्या तासाच्या फरकाने जन्माला आलेल्या या मुलांच्या नातेवाईकांना हॉस्पिटल स्टाफने चुकीची माहिती दिल्याने हा सगळा गोंधळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना एमबी हॉस्टेलचे अधीक्षक डॉ. आर.एल. सुमन यांनी सांगितले की, ओळख पटवण्यासाठी आम्ही दोन्ही अर्भकांचा रक्तगट, दोन्ही मातांचे सोनोग्राफी रिपोर्ट, अर्भकांच्या जन्माची वेळ, यासह इतर बाबींची सखोल तपासणी केली. त्यामधून या नवजात अर्भकांची माता कोण याची ओळख पटली. तसेच त्याचा निष्कर्ष पालकांनीही मान्य केला. त्यानंतर मीरा नगर येथील अनिता रावत यांना मुलगी तर चित्तोडगड येथील रामेश्वरी सोनी यांच्याकडे मुलगा सोपवण्यात आला, अशी माहिती एमबी हॉस्टेलचे अधीक्षक डॉ. आर.एल सुमन यांनी सांगितले.
डॉ. सुमन यांनी पुढे सांगितले की, सुमारे १५ दिवसांनंतर दोन्ही अर्भकांचा डीएनए अहवाल येणार आहे. त्यामुळे या अर्भकांचे पालक तोपर्यंत वाट पाहून निर्णय घेऊ शकतात. या प्रकरणात कुठे हलगर्जीपणा झाला याबाबत चौकशी करण्यासाठी आरएनटी मेडिकल कॉलेजचे प्रिंसिपल डॉ. विपिन माथूर यांच्या सूचनेनुसार तपास समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अशी चूक का आणि कशी झाली, याचा शोध घेईल. त्यावरून पुढे दोषींवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
गेल्या बुधवारी या रुग्णालयात २ नवजात अर्भकांची अदलाबदली झाली होती. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोन महिलांची प्रसुती झाली. त्यामधील एकीने मुलाला तर एकीने मुलीला जन्म दिला. मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन थिएटरबाहेर जाऊन दोन्ही अर्भकांच्या नातेवाईकांना चुकीची माहिती दिली. त्यावरून वादाला सुरुवात झाली. डॉक्टरांनी जेव्हा ही चूक पकडली, तेव्हा दोन्ही अर्भकांच्या नातेवाईकांना चुकीची माहिती दिली गेल्याने हा सगळा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दोन्हीकडचे नातेवाईक मात्र हे मान्य करण्यास तयार नव्हते. त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला, अखेरीस पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.