उत्तर प्रदेशमधील मेरठ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेमी युगुलाच्या प्रेमकहाणीचा अत्यंत दु:खद असा अंत झाला आहे. कुटुंबीयांच्या नाराजीमुळे प्रेमी युगुलाने विषप्राशन करून आपलं जीवन संपवलं. ही घटना लोहियानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जागृती विहार एक्स्टेंशन २ येथे घडली आहे. येथे कारमध्ये बसलेल्या जोडप्याने सल्फासचं सेवन केलं. दोघांनाही हे बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत तरुणाचं नाव शिवांक असून, त्याचा १२ जानेवारी रोजी साखरपुडा झाला होता. तर १८ जानेवारी रोजी त्याचा विवाह होणार होता. तो एमबीएचा विद्यार्थी होता. तसेच फायनान्स कंपनीच्या लोन विभागात काम करत होता. तसेच आपल्या काकांसोबत दुकानही चालवायचा. शिवांक याचं शेजारच्या बवनपुरा गावातील सोनाली हिच्यासोबत मागच्या पाच वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. सोनाली ही शिवांकचा मित्र दीपांशू याची बहीण होती. तसेच ती खरखौदा येतील मेडिकल कॉलेजमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करत होती.
दरम्यान, या दोघांचं प्रेमप्रकरण सुरू असतानाच शिवांकच्या नातेवाईकांनी त्याचं लग्न सिखेडा गावातील एका तरुणीसोबत ठरवलं. तसेच सोमवारी त्याचा साखरपुडाही पार पडला होता. तर सोनालीच्या नातेवाईकांनी तिचा विवाह खरखौदा गावातील एका तरुणासोबत ठरवला. तसेच १८ तारखेला तिचा विवाह होणार होता.
दरम्यान, आज सकाळी ८ वाजता शिवांक हा दुकानात जातो म्हणून सांगत घरातून निघाला. त्यानंतर १० वाजण्याच्या सुमासार त्याने काकांना फोन करून मी सोनालीसोबत सल्फासचं सेवन केलं आहे आणि आम्ही जागृती विहार एक्स्टेंशन येथे कारमध्ये बसलो आहोत, असे सांगितले. जेव्हा नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा या दोघांच्याही तोंडामधून फेस येत होता. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.
आता या प्रकरणी पोलिसांना तपास सुरू केला असून, प्राथमिक तपासामध्ये हे प्रेमी युगुल खरखौदा येथील रहिवासी असून, त्यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरू होते, त्याच प्रकरणातून त्यांनी विषप्राशन केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. आता पोलीस या प्रकरणात तपासामधून जी माहिती समोर येईल, त्या आधारे पुढील कारवाई करणार आहेत.